बेंदूर सणांची माहिती-
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आधुनिकतेचे वारे कितीही वाहत असले तरी, शेतीचे महत्व आजही आबाधित आहे. बहुतांश भागात आजही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्र राज्य हे देशातील एक प्रगतिशील राज्य आहे. उद्योग व्यवसायात महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्याचप्रमाणे शेतीही महाराष्ट्रात जोमाने केली जाते.
आधुनिकतेमुळे खूप बदल झाले असले, तरी काही पारंपारिक साधने आजही शेतीसाठी वापरली जातात. पुरातन काळापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. शेतीच्या बहुतांश कामांमध्ये शेतकरी बैलांचा वापर करतात. वर्षभर हे बैल आपल्या मालकासाठी शेतात राबतात. शेतकरीही आपल्या बैलांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतात, प्रेमाने त्यांचा सांभाळ करतात. आपल्या या बैलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शेतकरी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करतात. बेंदूर सणांला बैल पोळा सण असेही म्हणतात.
बेंदूर सण कधी साजरा करतात-
बेंदूर/ पोळा हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. महाराष्ट्रात बेंदूर हा सण तीन वेगवेगळ्या तिथींना साजरा होतो. जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला महाराष्ट्रातील पश्चिम भागातील काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर साजरा करतात. यानंतर येणाऱ्या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा करतात. महाराष्ट्रातील बहुतांश भागात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. तर श्रावण महिन्यातील अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. साधारणता विदर्भात बैलपोळा साजरा होतो.
वेगवेगळ्या तिथींना बेंदूर सण साजरा करण्याची कारण-
बेंदूर हा सण पावसाळ्यात साजरा होतो. उन्हाळा संपत आला की शेतीची मशागतीची कामे पूर्ण होतात. पावसाळा सुरू झाला की शेतातील पेरणी व लावणीची कामे सुरू होतात. मुसळधार पावसाला जशी सुरुवात होते, तशी शेतातील बहुतांश कामे पूर्ण झालेली असतात. शेतकऱ्यांना थोडी उसंत मिळालेली असते, याच दरम्यान शेतकरी आपल्या बैलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवून, बेंदूर सण साजरा करतात.
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पावसाला सुरुवात होत नाही. केरळ किनारपट्टीवरून आलेला पाऊस आधी पश्चिम महाराष्ट्रात दाखल होतो, यानंतर तो पुढे मध्य महाराष्ट्रात सरकतो, आणि तसाच तो पुढे विदर्भात जातो.
पाऊस टप्प्याटप्प्याने पुढे सरकतो. यामुळे त्या त्या भागातील शेतीची कामे त्या अनुषंगाने पूर्ण होतात. या भौगोलिक कारणामुळे कदाचित तीन वेगवेगळ्या तिथींना महाराष्ट्रातील बेंदूर/ पोळा सण साजरा करतात. या सणांची नावे आणि साजरी करण्याची तिथी जरी वेगळी असली, तरी बेंदूर सण साजरा करण्याची पद्धत आणि त्यामागील भावना एकच आहे.
बेंदूर सणाची पूर्वतयारी-
बेंदूर सणाच्या साधारण चार दिवस आधी, मातीचे बैल घेऊन गावचे कुंभार गावोगावी तसेच शहरातही फिरतात. बहुतांश घरांमध्ये मातीच्या बैलांची जोडी विकत घेतात. हल्ली काही ठिकाणी या मातीच्या बैलांना छान रंग देऊन सजवतात. बेंदराच्या आदल्या दिवशी या बैलजोडीची श्रद्धेने पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवतात.
खांदेमळणी-
बेंदराच्या आदल्या दिवशी, शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची खांदे मळणी करतात. यामध्ये शेतकरी आपल्या बैलांच्या खांद्यांची तेल लावून मालिश करतात. यानंतर त्यांना गरम पाण्याने अंघोळ घालतात. यानंतर त्यांना खिचडा खायला घालतात. या खिचड्यामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारची धान्य किंवा डाळी, आधी भिजवतात आणि मग शिजवतात. वर्षभर हे बैल आपल्या मालकासाठी त्यांच्या खांद्यावर ओझं घेऊन राबतात, म्हणूनच त्यांची खांदेमळणी करतात.
बेंदूर सण कसा साजरा करतात-
बेंदरा दिवशी सकाळपासूनच सगळ्यांची लगबग सुरु असते. सकाळी दारांना तोरण बांधतात, ही तोरण सुंबाच्या दोरीत पिंपळाची पाने ओऊन बनवतात.
बेंदरा दिवशी सकाळी घरातील सर्व जनावरे गावच्या पाणवठ्याच्या ठिकाणी म्हणजेच, नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन, त्यांना छान आंघोळ घालतात. जनावरांचे गोटेही स्वच्छ झाडून, धुवून घेतात.
बैलांना आंघोळ घालुन, घरी आल्यानंतर त्यांना सजवतात. त्यांच्या शिंगांना रंग देतात. शिंगांच्या टोकांना छान तुरे लावतात. तसेच त्यांच्या शिंगांमध्ये डाळीचे पीठ व गुळ यांपासून बनवलेले कडबोळे घालतात, गळ्यात घुंगराची माळ घालतात. डोक्याला बाशिंग बांधतात.
बैलांच्या अंगावर वेगवेगळे रंगीबिरंगी छाप उठवतात. त्यांच्या अंगावर छान झूल घालतात. बैलांच्या पायांमध्ये दोऱ्यापासून विणलेले तोडे घालतात. त्यांना नवीन वेसन व कासरा घालतात.
घरातील स्त्रिया पारंपारिक वेशात तयार होतात. घरात पुरणपोळी बनवली जाते. काही ठिकाणी करंज्या व चकल्या पण बनवतात. यानंतर घरातील सर्वजण मिळून बैलांची पूजा करतात, त्यांचे औक्षण करतात व त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात.
बेंदरा दिवशी बैलांना पूर्ण दिवस आराम करायला देतात. शेतीच्या कोणत्याही कामासाठी त्यांना जुंपले जात नाही. शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची या दिवशी प्रेमाने काळजी घेतात.
मिरवणुका-
दुपारनंतर बैलांना मिरवणुकीसाठी तयार करतात. यानंतर गावातील सर्व बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. गावातील सर्व अबालवृद्ध, लहान मुली- मुले, स्त्रिया पारंपारिक वेशात, या मिरवणुकीत आनंदाने सहभागी होतात. गावच्या वेशीपर्यंत या मिरवणुका काढल्या जातात.
कर ओलांडणे-
काही ठिकाणी आजही, बेंदरादिवशी कर ओलांडायची प्रथा आहे. यामध्ये गावातल्या काही प्रतिष्ठित मानकरी लोकांच्या बैलांकडून गावच्या वेशीवर बांधलेली कर ओलांडली जाते. गाव वेशीवर चालणारा हा एक पारंपारिक सोहळा आहे.
काही गावांमध्ये बैलजोडींच्या सजावटीची स्पर्धा आयोजित केली जाते. यावेळी उत्कृष्ट सजावट केलेल्या बैल जोडीला बक्षीस दिले जाते.
मिरवणुकी वरून घरी आल्यानंतर, घरच्या जाणकार स्त्रिया आपल्या लाडक्या बैल जोडी वरून, भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतात. त्यांचे औक्षण करून त्यांना घरात घेतात. घरी आल्यानंतर सायंकाळी त्यांची दृष्टही काढली जाते.
शेतकऱ्यांविषयी थोडसं-
माणसाने कितीही प्रगती केली तरी, अखंड मानव जातीसाठी लागणारी अन्नधान्याची गरज, पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबव लागतच. शेतकरी पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचा योग्य मिलाफ घडवत शेतात कष्ट करतात आणि अन्नधान्य पिकवतात.
समारोप-
शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांची बैल म्हणजे जणू पोटची पोरंच. आपल्या मालकासाठी ही बैल जोड शेतात ईमानाने राबते, आणि याच ईमानाची जाणीव ठेवून, काही अंशी त्यांची परतफेड म्हणून, बैलपोळा किंवा बेंदूर हा सण साजरा केला जातो.