‘’ सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती,
ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची ही वेडी माया…..’’
वाचताना जरी या साध्या चार ओळी वाटत असल्या, तरी भावा-बहिणींच्या नात्यामधल प्रेम यातून दिसून येत.
श्रावण पौर्णिमेला सर्वत्र मोठ्या आनंदात रक्षाबंधन सण सर्वत्र साजरा करतात. संपूर्ण भारतभर रक्षाबंधन सण साजरा होतो. भारतभर जरी वेगवेगळ्या नावांनी रक्षाबंधन सण साजरा होत असला, तरी त्यामागील भावना एकच आहे. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन सण होय.
लहानपणी भावा बहिणींमध्ये कितीही रुसवे फुगवे, मारामाऱ्या आणि अबोले असले तरीही ते एकमेकांना समजून घेतात आणि तितक्याच प्रेमाने जपतातही. घरात कितीही भांडले तरी, घराबाहेर मात्र हे भाऊ-बहीण एकमेकांना प्रेमाने सांभाळून घेतात.
घरात आई-बाबांच्या ओरड्यापासून लहान भावाला पाठीशी घालणारी मोठी बहीण असो किंवा मग शाळेतून छोट्या बहिणीला सांभाळून घरी आणणारा दादा असो, भावा-बहिणीच हे नात म्हणूनच खास आहे. जसजसे हे भाऊ-बहिण मोठे होतात, तसतसे त्यांच्यातले नाते अधिक घट्ट होते. लहानपणी एकमेकांना जपणारे हे भाऊ-बहीण मोठे होतात आणि एकमेकांच्या पाठीशी आयुष्यभरासाठी खंबीरपणे उभे राहतात. हो, पण हे वयाने जरी मोठे झाले तरी, यांची एकमेकांच्या खोड्या काढायची सवय काही कमी होत नाही.
रक्षाबंधन सण कधी साजरा करतात
श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करतात. याच पौर्णिमेला नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणतात, तसेच राखी पौर्णिमा असेही म्हणतात. रक्षाबंधन हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे.
रक्षाबंधन सणाची पूर्वतयारी
रक्षाबंधन सणाच्या जवळपास पंधरा दिवस आधीपासूनच याची तयारी बाजारात चालू असते. वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्यांनी बाजार जणू फुलून जातो. तसेच वेगवेगळ्या भेटवस्तू, चॉकलेट आणि मिठाया यांचीही बाजारात रेलचेल असते.
राखी-
बाजारात राख्या बघायला मिळाल्या की वेध लागतात ते राखी पौर्णिमेचे. भावा-बहिणींच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. बाजारात वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्या आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळी कलाकुसर केलेल्या राख्या आपल्याला पाहायला मिळतात. छोट्या मुलांसाठी वेगवेगळ्या कार्टून्सच्या राख्या बाजारात उपलब्ध असतात. अगदी छोट्या बाळांसाठी लाईट लागणाऱ्या किवां मग आवाज करणाऱ्या राख्या सुद्धा बाजारात पाहायला मिळतात.
हल्ली आपल्या आवडीप्रमाणे राख्या तयारही करून मिळतात. म्हणजे आपल्या भावाला एखादी गोष्ट आवडत असेल तर त्यानुसार या राख्या तयार केल्या जातात. आपल्या भावाच्या नावाची राखीही हल्ली आपण तयार करून घेऊ शकतो.
एक रुपयाला मिळणारी गोंड्याची राखी असेल किंवा मग लाखाच्या घरात मिळणारी सोन्याची राखी, प्रत्येक बहिण आपल्या आवडीप्रमाणे राखी विकत घेते. राखी किती रुपयांची आहे हे महत्त्वाचं नसतं, तर त्यामागील भावना महत्त्वाच्या असतात, आपल्या लाडक्या भावासाठी असणारे प्रेम महत्त्वाचे असते.
आजही काही स्त्रिया आपल्या लाडक्या भावासाठी स्वतःच्या हाताने राख्या तयार करतात. आपल्या प्रियजनांसाठी आपल्या हाताने काही गोष्टी तयार करण्यातला आनंद नेहमीच खास असतो.
हल्ली, रक्षाबंधनच्या आधी शाळांमध्ये राख्या तयार करण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. यात सर्व गटातील विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात. प्रत्येकजण आपली कलाकुसर यावेळी सादर करतो.
भेटवस्तू
रक्षाबंधन दिवशी, बहिणीने औक्षण करून राखी बांधाल्यावर तिला भेटवस्तू द्यायची प्रथा आहे. वयानुसार मिळणाऱ्या भेटवस्तूही बदलतात. लहानपणी चॉकलेट व बाहुलीची हौस असते, तर थोडे मोठे झाल्यावर फ्रॉक किंवा मग ज्वेलरी आवडते, अजून थोड मोठे झाल्यावर इलेक्ट्रॉनिक गॅजेट ची हौस असते. लग्न झाल्यानंतर मात्र प्राधान्यक्रम बदलतात, म्हणून मग भेटवस्तूंचे स्वरूपाही बदलते.
भेटवस्तू किती रुपयांची आहे, हे महत्त्वाचं नसतं तर त्यामागील प्रेमळ भावना महत्त्वाच्या असतात. ह्या भेटवस्तू देताना सुद्धा, भाऊ नेहमीप्रमाणे बहिणीची चेष्टाच करतो. आपल्या भावाकडून मिळालेली भेटवस्तू घेऊन बहीण अगदी आनंदून जाते. भावाकडून मिळालेल्या या भेटवस्तूंचे बहिणीला कायमच कौतुक असते.
आता काळ कितीही बदलला, आपण कितीही मोठे झालो, तरी लहानपणी आपल्या भावाने त्याच्या पिग्गी बँक मध्ये साठवलेल्या पैशातून, आपल्याला जे गिफ्ट देतो, त्याची सर मोठ मोठ्या गिफ्टना नाही येत.
रक्षाबंधन सणाच्या आधी ह्या भेटवस्तुनी बाजार अगदी फुलून जातो. साड्या, ड्रेसेस, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, गाड्या आणि बऱ्याच गोष्टींनी बाजार तयार असतो.
मिठाई
रक्षाबंधनच्या आधीपासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया पाहायला मिळतात. राखी बांधून औक्षण केल्यानंतर लाडक्या भावाला बहीण गोड भरवते. याच गोडासाठी भरपूर पर्याय हल्ली उपलब्ध आहेत. वेगवेगळी चॉकलेट्स, लाडू, गुलाबजाम आणि वेगवेगळ्या मिठाई यांची जणू रेलचेलच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे या मिठाई विकत घेतात आणि सणाचा गोडवा वाढवतात.
रक्षाबंधन सण कसा साजरा करतात
श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा होतो. या दिवशी सकाळपासूनच लगबग सुरू असते. सकाळीच घरदार लोटून स्वच्छ करतात, दारात सुंदर रांगोळी काढतात. घरही सणासाठी नीटनेटके सजवतात.
घरात गोडा धोडाचा स्वयंपाक करतात. काही ठिकाणी पुरणपोळ्या बनवतात, कोणी गुलाबजाम बनवतात तर काहीजण पुरी-भाजी किंवा श्रीखंड-पुरी बनवतात. रक्षाबंधन दिवशी वेगवेगळ्या पंच-पक्वानाची मैफिलच असते जणू.
महिला व मुली नवीन साड्या नेसून किंवा ड्रेस घालून सुंदर तयार होतात. नेहमी कामाच्या घाई गडबडीत असणारया स्त्रिया सणा दिवशी मात्र पारंपारिक वेषात तयार होतात. भरजरी साड्या, दागिने, केसांचा आंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा अशा पारंपारिक साजात स्त्रिया तयार होतात. तसेच पुरुष वर्गही पारंपारिक वेषात तयार होतात.
रक्षाबंधणासाठी घरात पाट मांडून, त्या भोवती पानाफुलांची सुंदर रांगोळी काढतात. औक्षणासाठी आरतीचे ताट तयार करतात. घरात देखील फुलांची छान आरास करतात. औक्षणाची सर्व तयारी झाल्यावर पहिली राखी आधी देवघरातील देवांना बांधतात, आणि त्यांचे औक्षण करून त्यांना नैवैद्य दाखवतात.
आता घरातील रक्षाबंधन साजर करतात, लाडक्या भाऊरायाला पाटावर बसवतात. भावाच्या कपाळावर टिळा लावतात, त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधतात, त्याचे औक्षण करून, त्याला नमस्कार करतात आणि मग गोड खायला देतात.
आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभावे, त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, त्याला उत्तम यश मिळावे, अशी प्रार्थना बहिण आपल्या लाडक्या भावासाठी करते, भाऊही यावेळी आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो. तसेच आपल्या लाडक्या बहिणीला छान भेटवस्तूही देतो.
काही ठिकाणी भावाच्या डाव्या गालावर काजळाचा छोटा टिळा लावायची प्रथा आहे. आपल्या लाडक्या भावाला कोणाची नजर नको लागायला, हा त्यामागचा उद्देश आहे.
आधुनिक रक्षाबंधन
आजच्या आधुनिक काळात करिअर साठी बरेच जण घरापासून लांब जातात, तर काहीजण अगदी सातासमुद्रापारही जातात. अशावेळी प्रत्येक सणाला घरी येणं तसं शक्य होत नाही. कामानिमित्त भाऊ घरापासून लांब असला तरी, बहीण आपल्या लाडक्या भावासाठी आठवणीने राखी पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवते. त्यासोबतच काळजीने लिहिलेलं पत्र किंवा मग ग्रीटिंग कार्ड असतं. रक्षाबंधनसाठी पोस्ट खातं आणि कुरिअर स्टाफ, राख्या वेळेत पोहोचाव्या यासाठी अहोरात्र मेहनत घेत असत.
तसेच हल्ली आधुनिक तंत्रज्ञानातील व्हिडिओ कॉल किंवा झूम मिटच्या मदतीने हे सण साजरे होतात. अशावेळी एकमेकांपासून अंतर जरी जास्त असलं तरी, मन मात्र कायम जवळच असत. सणावाराला आपल्या माणसांच्या आठवणी वेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा हा उपयोग खरच मोलाचा आहे.
रक्षाबंधन सणा मागची कथा
रक्षाबंधन सणाची सुरुवात नेमकी कधी झाली, कोणी केली, कशी केली हे नक्की सांगता येणार नाही. पण रक्षाबंधन साजरा करण्यामागे काही पुरातन कथा पाहायला मिळतात. त्या खालील प्रमाणे आहेत-
दानवांचा राजा असणाऱ्या वृत्रासुरा सोबत युद्ध करण्यासाठी इंद्रदेव निघाले असता, त्यांच्या पत्नीने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर, विष्णू देवांनी दिलेला एक धागा बांधला. त्यामुळे इंद्रदेवांचा आत्मविश्वास वाढला व त्यांना युद्धात विजय मिळाला. या धाग्याने इंद्रदेवांची रक्षा झाली. तेव्हापासून रक्षाबंधन सुरू झाले असे म्हणतात.
बळीराजा अश्वमेध यज्ञ करत होते, तेव्हा तेथे प्रसन्न होऊन विष्णू देव वामन अवतारात प्रकट झाले. बळीराजांचा दानशूरपणा पाहण्यासाठी विष्णूदेवांनी त्यांच्याकडून तीन पावलं जमीन मागितली. बळीराजांनी आनंदाने त्यांना जमीन देण्याचे कबूल केले. बळीराजानी वामनरुपी विष्णूदेवांना तीन पावलं मोजायला सांगितली, पहिल्या पावलात पृथ्वी सामावली, दुसऱ्या पावलात स्वर्गलोक सामावले आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेऊन त्यांना पाताळलोकात नेले. यावर बळीराजाने पातळलोकात राहण्याचा निर्णय घेतला, पण भगवान विष्णूंकडे त्यांनी एक वर मागीतला की, त्यांना सदैव विष्णू देवाचे दर्शन व्हावे. तेव्हा भगवान विष्णू देखील पाताळात राहायला लागले.
पण यामुळे माता लक्ष्मी यांना विष्णू देवाचे दर्शन मिळेना. घडलेला सर्व प्रकार कळाला, तेव्हा माता लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून त्यांना भाऊ बनवले व भगवान विष्णू यांना वैकुंठात पाठवण्याची विनंती केली. बळीराजाने लक्ष्मीमातेची ही मागणी मान्य केली. तेव्हापासून रक्षाबंधन सणाला सुरुवात झाली असे म्हणतात.
महाभारतात अशी कथा आहे की, एकदा श्रीकृष्णांच्या हाताला लागले, त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. तेव्हा द्रौपदीने लगेच तिच्या शालूच्या पदराची किनार फाडून, ती श्रीकृष्णाच्या हाताला बांधली, त्यामुळे जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबला. तेव्हा श्रीकृष्णांनी आजीवन द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले. तेव्हापासून रक्षाबंधन साजरे होऊ लागले, असे म्हणतात.
माहेरवाशिनींचा सण
लग्न झालं की मुलींसाठी बऱ्याच गोष्टी बदलतात, सुरुवातीला बहीण आवर्जून आपल्या माहेरी सणांसाठी जाऊन हक्काने स्वतःचे कोड-कौतुक करून घेते. पण प्रत्येक वेळी सणांसाठी माहेरी जायला जमतच असं नाही.
जेव्हा बहिण रक्षाबंधन साठी माहेरी येत नाही, तेव्हा तिचा लाडका भाऊ वेळात वेळ काढून, आठवणीने बहिणीच्या घरी जातो. जाताना सोबत आईने बनवलेला बहिणीच्या आवडीचा पदार्थ घेतो तसेच भेटवस्तूही घेतो. बहिणी आतुरतेने आपल्या भावाची वाट पाहत असते. राखी बांधून झाल्यानंतर, आपल्या लाडक्या भावाला बहिण प्रेमाने जेऊ घालते. लहानपणी हट्टाने घर डोक्यावर घेणाऱ्या बहिणीने जबाबदारीने फुलवलेला संसार बघून, भावालाही आनंद होतो.
राखी बांधण्यामागचे शास्त्रीय कारण
रक्षाबंधनाच्या दिवशी वातावरणातील यमलहरींचे प्रमाण जास्त असते. यमलहरींचे प्रमाण शरीरात प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास प्राणाला किंवा जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता असते. जेव्हा बहिणी द्वारे राखी बांधली जाते, तेव्हा या यमलहरी शांत होऊन, जीवावरचा धोका टळतो. अशी कथा शास्त्रात सांगण्यात आली आहे.
सामाजिक बांधिलकी
सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन, हल्ली बऱ्याच ठिकाणाहून, सीमेवर आहोरात्र झटणाऱ्या आपल्या जवानांसाठी सुद्धा राखी पाठवण्यात येते. तसेच अनाथआश्रमात राहणाऱ्या मुलांना सुद्धा राखी बांधून त्यांना मिठाई वाटण्यात येते. काही ठिकाणी झाडांना सुद्धा राखी बांधतात. समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबवण्यात येणारे हे उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र आहेत.
समारोप
आपल्या संपन्न संस्कृतीतला रक्षाबंधन हा एक सण. श्रावण महिन्यात निसर्गाला मिळालेली संपन्नता भावा-बहिणींच्या प्रेमळ नात्यातही अखंड राहावी, असेच जणू निसर्ग सांगत असावा.
भावा-बहिणीचं नातं आहेच मुळी आंबट-गोड. भावाने बहिणीला कितीही त्रास दिला, चिडवलं तरी, बहिणीच्या लग्नात तिच्या पाठवणी वेळी, तिला कुशीत घेऊन रडणारा भाऊच असतो.
या लाडक्या भावा बहिणींच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय.