श्रावण महिन्याची माहिती | Shravan Month Information In Marathi

‘ श्रावण मासी हर्ष मानसी,

 हिरवळ दाटे चोहिकडे,

 क्षणात येते सरसर शिरवे,

 क्षणात फिरुनी ऊन पडे….’

 श्रावण महिन्याचे वर्णन करणाऱ्या बालकवींच्या या ओळी अगदी समर्पक आहेत. श्रावण महिन्यात मुसळधार पावसाने उसंत घेतलेली असते आणि रिमझिम पावसाला सुरुवात होते. निसर्गाने सर्वत्र जणू हिरवागार शालू पांघरलेला असतो. सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.

मराठी महिन्यांमध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण महिन्यात निसर्गाला लाभलेली स्थिरता मानवी मनाला लाभावी, यासाठी आध्यात्मिक दृष्ट्याही हा महिना महत्त्वाचा आहे.

श्रावण महिना हा वर्षा ऋतूमध्ये येतो. मराठी महिन्यांमध्ये तो पाचवा महिना आहे. साधारण जुलै ते ऑगस्ट महिन्या दरम्यान श्रावण महिना येतो.

 श्रावण महिन्यात निसर्गात होणारे बदल-

 श्रावण महिना वर्षा ऋतूत येतो. जेष्ठ आणि आषाढ महिन्यातील मुसळधार पावसाची  संततधार, श्रावण महिन्यात थांबते. ऊन-पावसाचा खेळ जणू श्रावण महिन्यात सुरू होतो. या महिन्यात साधारण रिमझिम पाऊस सुरू होतो.  पावसाच्या सरी चालू होतात, तोच त्या निघून जातात आणि ऊन पसरू लागते. तर कधी कधी उन्हातच पाऊस बरसू लागतो. श्रावणातील पाऊस म्हणजे जणू  मोत्यांची बरसात. श्रावणातील ऊनही अगदी हळुवार अलगद रेशमा सारखे. श्रावणात सर्व वृक्ष वेली टवटवीत होतात. विविध फुलांना या महिन्यात बहर आलेला असतो. बाजारात विविध प्रकारची फुले, फळे आणि भाज्या यांची  जणू  लयलूटच असते.

 श्रावणात बहरलेला हा निसर्ग पाहून माणसाला परमेश्वराची आराधना करण्याची प्रेरणा मिळते. श्रावण महिन्यात विविध प्रकारची फुले बहरलेली असतात. रानावनात आणि डोंगर माथ्यावर भरपूर  फुले फुलतात. ही फुललेली फुले बघून मनही अगदी आनंदाने फुलून जाते. देवळाच्या बाहेर विकायला बसलेली विविध फुले बघितले की मन जणू प्रसन्न होते. तसेच श्रावणात होणाऱ्या विविध पूजांसाठी लागणारे साहित्यही देवळाबाहेर मिळते. यात केळीचे आणि  कर्दळीचे कोंब, केवड्याची पाने, कमळ आणि बरीच फुले पाहायला मिळतात.

 मुसळधार पावसाच्या दोन महिन्यानंतर श्रावणात भरपूर प्रकारची फळेही बाजारात उपलब्ध होतात. हल्ली विविध प्रकारची परदेशी फळेही बाजारात पाहायला मिळतात.

 श्रावण महिन्यात भरपूर प्रकारच्या भाज्या आपल्याला मिळतात. ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात मुसळधार पावसामुळे भाज्या उपलब्ध होऊ शकत नाहीत. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला विविध भाज्या शेतात लावल्या जातात, ज्या श्रावण महिन्यात आपल्याला खायला मिळतात. विविध फळभाज्या आणि पालेभाज्या यांची जणू लयलूटच श्रावण महिन्यात होते. काही ठराविक भाज्या तर फक्त श्रावण महिन्यातच पाहायला मिळतात.

 श्रावण महिन्यातील शेतीची कामे-

 श्रावण महिन्यात पावसाने उसंत घेतलेली असते. म्हणून शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतात. शेतातील लावणीची कामे झाल्यानंतर, ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यातील मुसळधार पावसामुळे, बहुतांश वेळा शेतात जाणं शक्य होत नाही. श्रावणात पावसाने उसंत घेतल्यामुळे बहुतांश शेतकरी, शेतातील भांगलणीची व फवारणीची कामे हाती घेतात.

 श्रावण महिन्यात येणारे सण-

 हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात विविध व्रतवैकल्ये, उपवास, पूजा, पारायण आणि जप मोठ्या श्रद्धेने केले जातात.

 श्रावण शुक्लपंचमीला सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी होते. गावोगावी असणाऱ्या वारुळाच्या ठिकाणी मुली व महिला छान तयार होऊन जातात व तेथे पूजा करतात. ज्या ठिकाणी नागदेवतेची देवळे आहेत, तेथे या दिवशी मोठ्या प्रमाणात जत्रा भरते. घरोघरी नागोबाच्या मातीच्या प्रतिकृतीची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

 यानंतर येणाऱ्या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमारक्षाबंधन असते. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांच्या आयुष्यातील महत्त्वाचा सण आहे. सागरा प्रति असणारी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मुसळधार पावसामुळे थांबलेली मासेमारी नारळी पौर्णिमेनंतर पुन्हा सुरू होते.

 भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधून त्याच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ तिला भेटवस्तू देतात. गोडाधोडाचा स्वयंपाक या दिवशी केला जातो.

 श्रावण कृष्ण अष्टमीला सर्वत्र मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते. भगवान श्रीकृष्ण यांचा हा जन्मदिन.  या दिवशी रात्री भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा कार्यक्रम साजरा होतो.

 श्रावण अमावस्येला बैलपोळा महाराष्ट्राच्या काही भागात साजरा करतात. आपल्यासाठी शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा करतात. या दिवशी बैलांची मनोभावे पूजा केली जाते.

 श्रावण महिन्यात होणाऱ्या पूजा व व्रतवैकल्ये-

 श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारला खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची मोठ्या उत्साहात पूजा केली जाते. या दिवशी महादेव मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. श्रावण सोमवारी भगवान शंकराच्या पिंडी वरती शिवमूठ वाहण्याची प्रथा आहे. ही शिवमुठ वाहताना तांदूळ, तीळ, मूग व जवस यांचा समावेश होतो. तसेच बेलाचे पान व पांढरी फुले ही वाहतात.

 श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी, मंगळागौरीची पूजा केली जाते. घरात आलेले नवीन सुनेचे कोड कौतुक यानिमित्ताने केलं जातं. या दिवशी मंगळागौरीची पूजा करून, घरातील व घराशेजारच्या स्त्रिया, रात्री झिम्मा फुगडीचे फेर धरतात व आनंदाने मंगळागौर साजरी करतात.

 श्रावण महिन्यात येणाऱ्या शुक्रवारी जरा आणि जिवंतीकेची पूजा केली जाते. घरातील लहान मुलांना दीर्घायुष्य लाभाव, यासाठी घरच्या स्त्रिया जरा जिवंतिकेची पूजा करतात. या पूजेनंतर मुलांचे औक्षण करतात. या पूजेसाठी दूर्वा, आघाडा व फुले वाहतात.

श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी काही जण शनीची पूजा करतात. या पूजेसाठी रुईच्या पानांचा मान आहे. येणारी संकट दूर व्हावी त्यासाठी ही पूजा करतात.

 श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते. घरासाठी व घरातील सर्वांच्या सुख समृद्धीसाठी ही पूजा केली जाते. घरातील दांपत्य जोडीने ही पूजा करतात. सत्यनारायण पूजेची सुबक मांडणी मनाला प्रसन्न करते.

 याचबरोबर श्रावण महिन्यात काही धार्मिक पुस्तकांची पारायण केले जातात. गावच्या देवळात एकत्र येऊन ही पारायण केली जातात, तसेच काही ठिकाणी जपही करतात.

 श्रावण महिन्यात निसर्गाला लाभलेली स्थिरता, या महिन्यातील धार्मिक व आध्यात्मिक वातावरणामुळे, मानवी मनालाही लाभते. सर्वत्र अगदी आनंदाचे व उत्साहते वातावरण असते. या महिन्यातील विविध पूजांमुळे घरी पाहुण्यांची ये-जा असते. गोडा-धोडाचा स्वयंपाक करून आग्रहाने सर्वाना वाढले जाते. या मागचा एक उद्देश म्हणजे आपली परंपरा व संस्कृती यांची येणाऱ्या पिढीला माहिती व्हावी.

  श्रावण महिन्यातील वर्षा सहली-

 श्रावण महिन्याला असणाऱ्या धार्मिक वातावरणामुळे बरेच जण तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. बरेच जण नियोजन करून सहकुटुंब तीर्थक्षेत्राना भेटी देतात. यासाठी विविध ठिकाणी, तीर्थक्षेत्र भेटींचे खास आयोजन केले जाते. तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यामागील आणखीन एक कारण म्हणजे, तिथे असणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या मनाला लाभावी, यामुळे मन शांत व प्रसन्न व्हावे, आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात व्हावी.

 श्रावण महिन्यात वर्षा सहलींचे सुद्धा आयोजन केले जाते. कडा- कापार्यानवरून कोसळणारे धबधबे पाहायला, ओसंडून वाहणारी नदी पाहायला, सुट्टीच्या दिवशी लोकांची गर्दी होते. निसर्गाचे हे रूप पाहणे हा एक वेगळाच आनंद आहे.

 समारोप-

 असा हा सर्वांना आवडणारा श्रावण महिना. निसर्गाच्या विविध रूपांनी आणि वेगवेगळ्या सणांनी भरलेला श्रावण महिना, सर्वांनाच हवावासा वाटतो. अशा या भरजरी श्रावण महिन्याने कवींना भुरळ घातली नसती, तरच नवल. विविध कवींनी व लेखकांनी श्रावण महिन्यावर भरभरून लिहिले आहे. कवी कुसुमाग्रजांच्या भाषेत, श्रावण म्हणजे, ‘ ‘ ‘‘हसरा नाचरा, जरासा लाजरा आणि सुंदर साजरा.’’

Leave a Comment

Pin It on Pinterest

Share This