नागपंचमी सणाची माहिती ( Nag Panchami Information In Marathi)

नागपंचमी सणाची प्रस्तावना-

‘’चलं गं सखे, चलं गं सखे वारुळाला, 

नागोबाला पुजायला, गं पुजायला’’

 अशी गाणी म्हणत मुली तसेच स्त्रिया पारंपारिक वेशात तयार होऊन, नागपंचमीच्या सणाला, गावात असणाऱ्या वारुळाला पूजनासाठी जातात.

 नागपंचमीचा सण कधी साजरा करतात-

 श्रावण महिन्याला धार्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे सण-वार आणि व्रतवैकल्यांचा महिना.  श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुक्ल पंचमीला, नागपंचमी सर्वत्र साजरी केली जाते.

 नागपंचमी का साजरी करतात-

 भगवान श्रीकृष्ण यांना मारण्यासाठी, त्यांच्या कंस मामाने, कालिया नागाला पाठवले. हा नाग द्वारका नगरीत धुमाकूळ घालत होता.

 एकदा बाल श्रीकृष्ण, आपल्या सवंगड्यांसोबत, यमुना नदीच्या काठावर खेळत होते. खेळताना अचानक त्यांचा चेंडू नदीत गेला. बाल श्रीकृष्ण तो चेंडू आणायला नदीत उतरले, तोच त्यांच्यावर कालिया नागाने हल्ला केला. कालिया नागाचा बाल श्रीकृष्णाने पराभव केला.

 कालिया नाग सर्वांना त्रास देत होता. कालिया नागाचा पराभव झाला, हे समजताच, सर्व गावकऱ्यांनी आनंद साजरा केला. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला, तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा. त्या घटनेची आठवण म्हणून, आजही श्रावण शुक्ल पंचमीला, सर्वत्र मोठ्या उत्साहात व आनंदात नागपंचमी सण साजरा करतात.

 भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवांना एक विशेष स्थान आहे. 

भगवान शंकरांनी नाग आपल्या गळ्यात धारण केला आहे.

 भगवान श्रीविष्णू हे शेषनागावरती विराजमान आहेत.

 तर, भगवान श्री गणेश यांनी आपल्या कमरे भोवती नाग बांधला आहे.

 काही विशिष्ट देवळांमध्ये गाभाऱ्यातील मुख्यमूर्तीच्या मागे नागाची प्रतिकृती असते.

 याचप्रमाणे विविध भारतीय पुराण कथांमध्ये नागदेवतेचे महत्व वेळोवेळी विशद केले आहे.

 भावाच्या नावाचा उपवास-

 नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिला व मुली, भावाच्या नावाने उपवास करतात. आपल्या भावाला उदंड आयुष्य प्राप्त व्हावे, त्याला उत्तम यश मिळावे आणि त्याला विविध आयुधांची प्राप्ती व्हावी, ही मनोकामना धरून महिला व मुली हा उपवास करतात. काही ठिकाणी हा उपवास त्याच दिवशी संध्याकाळी सोडतात. तर काही ठिकाणी नागपंचमी दिवशी हा उपवास सोडतात.

 नागपंचमी सण कसा साजरा करतात-

 नागपंचमीच्या साधारण चार दिवस आधी, गावचे कुंभार, गावोगावी तसेच शहरातही, माती पासून बनवलेली नागाची प्रतिकृती विकायला येतात. गावाकडे जवळपास सर्वजण या मूर्ती घेतात. शहरात काही ठिकाणी इच्छेने या मूर्ती घेतात. गावाकडे नागाची ही मूर्ती घरातील लहानग्यांकडून घरात घेतात. ती मूर्ती घरी घेताना आधी त्या लहानांच्या पायावर पाणी घालतात, त्यांच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतात आणि मग त्यांना घरात घेतात.

 ही नागाची मातीची मूर्ती घरातील देव्हाऱ्यात श्रद्धेने, भोपळ्याच्या पानावर ठेवतात. विधीवत त्यांची पूजा करतात. दूध साखरेचा नैवेद्य त्यांना दाखवतात.

 नागपंचमी दिवशी सकाळपासूनच महिलांची व मुलींची लगबग सुरू होते. त्या दार व घर स्वच्छ करतात. दारात छान रांगोळी काढतात. घरात असणाऱ्या मातीच्या नागाच्या प्रतिकृतीची पूजा करून, त्या नैवेद्याची तयारी करतात. यानंतर महिला व मुली पारंपारिक वेशात छान तयार होतात, पूजेचे साहित्य घेऊन, सर्वजणी मिळून, गावात असणाऱ्या वारुळाच्या ठिकाणी जातात. सर्व महिला मिळून यथासांग वारुळाची पूजा करतात.

 नागपंचमी दिवशी, गावातील वारुळाच्या जवळ झाडाला झोके बांधले जातात. वारुळाची पूजा झाल्यानंतर महिला व मुली या झोक्यांवर बसून उंचाच्या उंच झोके घेतात. तर काही महिला व मुली फेर धरून, गाणी म्हणत, झिम्मा-फुगडीचे  खेळ खेळतात. पारंपारिक वेशात तयार झालेल्या, या महिला व मुलींच्या मनमुराद खेळण्याने वातावरण जणू प्रसन्न होते.

 रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीतून, थोडासा वेगळेपणा या सणांमुळे महिलांना अनुभवायला येतो. सणांचे हे दिवस आनंदाने साजरे करून, त्या पुन्हा जोमाने एक नवी सुरुवात करतात.

 नागपंचमीचा नैवेद्य-

 नागपंचमी दिवशी प्रामुख्याने दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच ज्वारीच्या लाह्या, लाही पिठाचे लाडू आणि शेंगदाणे यांचाही नैवेद्य दाखवला जातो. त्या त्या भागातील प्रचलित प्रथांनुसार तेथील नैवेद्य बनवले जातात.

 जसे की काही ठिकाणी नागपंचमी दिवशी काही लाटायचं नाही, असं म्हणतात, तेथे धपाटे आणि काळ्या वाटाण्याची उसळ आणि ओल्या नारळाच्या करंज्या बनवतात.

 तर काही ठिकाणी नागपंचमी दिवशी काही थापायचं नाही, असं म्हणतात, अशा ठिकाणी छान पुरणपोळ्या बनवल्या जातात.

 नागपंचमी संबंधी काही पारंपारिक प्रथा-

 नागपंचमी दिवशी महिला व मुली फेर धरून फुगडीचे खेळ खेळतात. साधारण आषाढी एकादशी पासून सुरू झालेले हे खेळ गणपती विसर्जनापर्यंत चालतात. नागपंचमीची विविध गाणी म्हणत व विविध खेळ खेळत, महिला व मुली झिम्मा फुगडीचे फेर धरतात.

 नागपंचमी दिवशी मातीच्या नागाची पूजा करून, नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी ही प्रथा प्रचलित नाही, तेथे पाटावरती नागांची प्रतिकृती रेखाटली जाते आणि त्यांची पूजा करून, नैवेद्य दाखवला जातो.

 बऱ्याच ठिकाणी नागपंचमी दिवशी गळ्यात पवतं घालण्याची प्रथा आहे. पवतं म्हणजे, हळदीत भिजवलेला दोरा. काही गावांमध्ये हे पवतं, ग्रामदेवतेच्या देवळात देतात तर काही ठिकाणी हे घरी बनवतात. वर्षभर नागराया पासून आपलं रक्षण व्हावं, या श्रद्धेपोटी पवतं गळ्यात घालण्याची प्रथा आहे. घरातील सर्वजण हे पवतं गळ्यात घालतात.

 विसर्जन-

 नागपंचमी नंतर साधारण पाच दिवसांनी घरात बनवलेल्या मातीच्या नागांचे विसर्जन करतात. भाजी, भाकरीचा आणि वडीचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य त्यांना दाखवला जातो, यानंतर विधीवत त्यांचे विसर्जन केले जाते. नदी, विहिरी, ओढा किंवा तलाव यासारख्या पाण्याच्या ठिकाणी त्यांचे विसर्जन करतात. तर काहीजण घरीच त्यांचे विसर्जन करतात. हे विसर्जन करताना घरातील सर्वांचं पवतं सुद्धा त्यासोबत विसर्जित करतात.

 सर्प शेतकऱ्यांचा मित्र-

 शेतात तयार झालेली पिक उंदीर किंवा घुशी खातात, व त्याची नासधूस करतात. यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान होतं. शेतातील उंदीर व घुशींना साप खातात. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळते, म्हणून सापांना, शेतकऱ्यांचा मित्र असे म्हणतात.

 नागपंचमीसाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील ठिकाण-

 महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा हे गाव नागपंचमीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. बत्तीसशिराळ हे गाव सांगली जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहे. या ठिकाणी जिवंत नागांची पूजा केली जायची. देश-विदेशातील लोक या पूजा करण्यासाठी बत्तीसशिराळ्याला हजेरी लावायचे. बत्तीसशिराळा येथे नागपंचमीला मोठा उत्सव साजरा व्हायचा. विविध जातीचे साप यावेळी तेथे पाहायला मिळायचे. त्या सापांसोबत लोक हौसेने फोटोही काढायचे.

 मध्यंतरीच्या काळात झालेल्या काही कायदेशीर प्रक्रियांमुळे बत्तीसशिराळा येथे होणाऱ्या, या उत्सवावर कायदेशीर बंदी घालण्यात आली. बत्तीसशिराळा येथे आजही नागपंचमी साजरी होते, पण तिचे प्रमाण आता अल्प आहे.

 सामाजिक बांधिलकी-

 आपल्याला आढळणारे सर्व साप हे विषारी नाहीत. त्यातील काही साप विषारी असतात तर काही बिनविषारी असतात. पण आपण भीतीपोटी साप दिसला की त्याला मारतो. असे न करता सर्पमित्रांना बोलावून सापांना व्यवस्थित पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे ही आपली जबाबदारी आहे. नागपंचमी दिवशी साप दूध पितात असे मानून, जिवंत साप पकडून त्यांना दूध पाजणे हे नियमांना धरून नाही, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे.

 समारोप-

 आपले सण हे निसर्गाची जाण असणारे निसर्गातील प्रत्येक घटकाशी जवळील साधणारे व त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणारे आहेत. असाच हा नागपंचमीचा सण सर्वत्र उत्साहात व आनंदात साजरा होतो. 

Leave a Comment

Pin It on Pinterest

Share This