मराठी संस्कृती ही समृद्ध आणि संपन्न आहे. मराठी संस्कृतीचे विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतात, यातीलच एक पैलू म्हणजे मराठी सण. निसर्गाने आपल्याला कायमच भरभरून दिले आहे, यामुळेच बहुतांश मराठी सण हे निसर्गाशी व निसर्गातील विविध घटकांची जवळीक साधणारे आहेत. या सणांमध्ये आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. या लेखात आपण नारळी पौर्णिमा या सणां विषयी माहिती माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा सागर किनारा लाभला आहे. म्हणून सागरी खाद्य महाराष्ट्रात चवीने खाल्ले जाते. यामुळे सागर किनारी मासेमारी हा एक प्रमुख व्यवसाय आहे. वर्षातील साधारण नऊ ते दहा महिने मासेमारी चालते. मासेमारी करून त्यांचा व्यवसाय करणे, यावर कोळी बांधव आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात
अनुक्रमणिका
पावसाळ्यात मासेमारी बंद असण्याची कारणे-
पावसाळ्याला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा सुरुवातीला सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट असतो, मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होते, यामुळे समुद्रकिनारी वातावरण बदलायला सुरुवात होते. अक्राळविक्राळ लाटा आणि थैमान घालणाऱ्या पावसामुळे समुद्र अशांत होतो, अशा अशांत समुद्रात मासेमारी करणे कोळी बांधवांना सहज शक्य होत नाही. म्हणून पावसाचे सुरुवातीचे दोन महिने, कोळी बांधव विश्रांती घेतात. या काळात ते आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात मासेमारी न करण्याचे आणखी एक कारण म्हणजे, यावेळी माशांचा प्रजनन काळ चालू असतो. या दोन महिन्यात माशांना कोणतीही इजा न करता, त्यांची संख्या वाढू देणे, हा एक उद्देश त्यामागे असतो.
शासन पातळीवर पावसाळ्याच्या या दिवसात मासेमारी करण्यासाठी कोळी बांधवांना परवानगी दिली जात नाही.
नारळी पौर्णिमेची पूर्वतयारी
श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पावसाची संततधार कमी होते. समुद्रातील हालचाली शांत होतात. आता कोळी बांधवांना वेध लागतात ते नारळी पौर्णिमेचे.
नारळी पौर्णिमेच्या आधी, कोळी बांधव आपल्या बोटीची डागडुजी व रंगरंगोटीची कामे पूर्ण करतात. मासेमारीसाठी लागणाऱ्या जाळीची दुरुस्ती करतात. तसेच मासेमारी करण्यासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची जमवाजमा करतात.
नारळी पौर्णिमा साजरी करण्याची पारंपारिक पद्धत
नारळी पौर्णिमे दिवशी सर्व कोळी बांधव, आपल्या कुटुंबीयांसोबत पारंपारिक वेशात आणि पारंपारिक लोकगीत म्हणत, वाजत गाजत मिरवणुका काढतात. संध्याकाळी या मिरवणुका सागर किनारी पोहोचतात. यावेळी कोळी बांधव त्यांच्या छान रंगरंगोटी केलेल्या व पताका लावून सजवलेल्या बोटीही सागर आणतात.
किनारी पोहोचल्यानंतर, सर्व कोळी बांधव एकत्र जमून दर्याची यथासांग पूजा करतात, प्रार्थना करतात. तसेच त्यांच्या बोटींचीही मनोभावे श्रद्धेने पूजा करतात व त्यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करतात. यानंतर समुद्राला नारळ अर्पण केला जातो.
श्रावणी पौर्णिमेला सर्व कोळी बांधव एकत्र जमून, समुद्राला नारळ अर्पण करून, पुन्हा मासेमारी चालू करतात म्हणून या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात
यावेळी कोळी बांधव दर्याला गाऱ्हान घालतात की, ‘ इथून पुढे मासेमारी करताना भरपूर मासे मिळू देत, खोल समुद्रात जाऊन मासेमारी करताना, कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये, कुणालाही इजा होऊ नये, मासेमारीला गेलेले कोळी बांधव सुखरूप आपल्या घरी परतु देत.’
कार्ल्याची एकवीरा देवी ही कोळी बांधवांची आराध्य देवता आहे.
नारळी पौर्णिमेला नारळच का अर्पण करतात
नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळच का अर्पण करतात, याबद्दल बऱ्याच अख्यायिका ऐकायला मिळतात. पण याबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की, सागरी किनाऱ्यावर तसं पाहिलं तर, इतर कोणत्याही फळांपेक्षा नारळाच्या झाडांचे प्रमाण भरपूर आढळते. नारळाच्या झाडाच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण किनारी भागात आहे. यामुळेच नारळ हे फळ कोळी बांधवांना वर्षभरात केव्हाही सहजतेने उपलब्ध होऊ शकते.
तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाला श्रीफळ असंही म्हणतात पूजांमध्ये नारळाला खास असे स्थान आहे तसेच नारळ शुभसूचकही मानतात.
पारंपारिक पक्वान
नारळी पौर्णिमेनिमित्त खास नारळापासून बनवलेले पदार्थ पाहायला मिळतात.हेच पदार्थ, समुद्रालाही पूजेवेळी अर्पण करतात. सर्व कोळी बांधव नारळापासून बनवलेले हे पदार्थ मोठ्या आवडीने खातात.
यामध्ये खास ओल्या नारळापासून बनवलेले करंज्या, नारळी भात व नारळवडी या पदार्थांचा समावेश होतो.
नारळी पौर्णिमा सणांची पारंपारिक गाणी
लहानपणापासून विविध कोळीगीतांनी कायमच मनात घर केले आहे. वेगळ्या चालीची आणि बोलीची कोळीगीत नेहमीच गुणगुणावी वाटतात. नारळी पौर्णिमे दिवशी, सर्व आबालवृद्ध कोळी बांधव, हीच पारंपारिक कोळीगीत गातात आणि वाजत गाजत पूजेसाठी दर्याला जातात.
काही सदाबहार कोळी गीत
- एकविरा आई तू डोंगरावरी…..
- आई माझी कोणाला पावली गो…..
- मी हाय कोली…..
- वल्लव रे नाखवा, वल्लव वल्लव…
- सण आलाय गो, नारळी पुनवेचा….
- डोंगराचे आरुण एक बाई चांद उगवला….
- वेसावची पारू नेसली तू….
- माहेरला जाते हो नाखवा….
- कशी झोकात चालली कोल्याची पोर…
- नाखवा, बोटीने फिरवाल का…..
पारंपारिक नृत्य
नारळी पौर्णिमे दिवशी दर्याला जाताना कोळी बांधव सहकुटुंब पारंपारिक गाणी गातात, तसेच त्यांचे पारंपारिक नृत्यही सादर करतात. कुटुंबातील आबालवृद्ध या पारंपारिक नृत्यात आनंदाने सहभागी होतात
आजच्या या आधुनिक युगातही कोळी बांधवांनी त्यांची पारंपारिक गाणी, नृत्य व संस्कृती अभिमानाने जपली आहे.
कोळी बांधवांचे आयुष्य
कोळी बांधवांचे उभे आयुष्य हे समुद्रावर अवलंबून आहे. नारळी पौर्णिमेनंतर, मासेमारीला पुन्हा सुरुवात होते. कोळी बांधव आपल्या बोटीसह मासेमारीसाठी समुद्रात जातात. काहीजण रात्री जाऊन पहाटे परत येतात, तर काहीजण आठ दिवसांसाठी समुद्रात जातात.
मासेमारी करून आल्यानंतर जमा झालेला माशांचा लिलाव होतो, यातून जे पैसे मिळतात, ते पैसे कोळी बांधव आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वापरतात. मासेमारीत मिळालेले छोटे मासे हे किनाऱ्यावरच विकले जातात, तर मोठे मासे हे विक्रीसाठी शहरी भागात पाठवले जातात. ते पाठवताना आईस बॉक्स चा वापर करतात.
आपण जे मासे चवीने खातो त्यामागे कोळी बांधवांचे अपार कष्ट आहेत. खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणं तितकसं सोप्पही नाही. अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी कधी, जीवितहानी ओढाऊ शकते. कोळी बांधवांच्या या धाडसाचे खरंच कौतुक आहे. आजही बरेचसे कोळी बांधव पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय जोपासत आहेत
समुद्रात जाणाऱ्या बोटी बनवण्यासाठी लागणारा खर्च व मासेमारीसाठी लागणाऱ्या इतर साहित्याचा खर्च भरपूर आहे. तसेच समुद्रात जाण्यासाठी कोळी बांधवांना शासनाचीही परवानगी घ्यावी लागते.
मासेमारी करताना काही कोळी बांधव आजही पारंपारिक साधनांचा वापर करतात. तर काही ठिकाणी पूर्णपणे आधुनिक पद्धतीने मासेमारी केली जाते.
महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईमध्ये साधारण वीस कोळीवाडे आहेत. येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मुंबईमध्ये असणाऱ्या विविध साधनसामग्रीमुळे येथे माशांचा व्यापार भरपूर होतो. मुंबईमधून बरेचसे मासे निर्यात केले जातात, तर काही ठराविक मासे आयातही होतात.
समारोप
कोळी समाज हा खूप कष्टाने मासेमारी करून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. नारळी पौर्णिमा सण हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. खूप उत्साहाने ते हा सण साजरा करतात आणि समुद्राप्रती त्यांच्या मनी असणाऱ्या कृतार्थ भावना ते आनंदाने सहकुटुंब व्यक्त करतात.