गुढीपाडवा सणाची माहिती (Gudi Padwa Information In Marathi)

 वसंत ऋतूचे आगमन जणू सर्वत्र नवचैतन्य घेऊन येते. झाडांना फुटलेली नवीन पालवी, फुल घातलेला गुलमोहर, सर्वत्र पसरलेला आंबेमोहराचा वास, कोकिळेचे कुहू कुहू गाणं; या सर्वांनी  वातावरण जणु बहरून जात. या सर्वांत चाहूल लागते ती ‘चैत्राची.’

 मराठी नववर्षाची सुरुवात होते ती चैत्र महिन्याने. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. मराठी वर्षातील पहिला सण हा गुढीपाडवा होय.

 गुढीपाडवा कधी साजरा करतात-

 चैत्र शुक्ल प्रतिपदेला सर्वत्र मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करतात. प्रत्येक मराठी सण साजरा करण्यामागं काही शास्त्रीय कारण आहेत. चैत्राच्या सुरुवातीला थंडीचे वातावरणातील प्रमाण कमी होऊन, वातावरणातील उष्मा वाढायला सुरुवात होते. वातावरणातील या बदलामुळे मानवी शरीरावरती कोणतेही अपाय होऊ नयेत, यासाठी काही पूर्वपार प्रथा आपण सांभाळत आहोत. गुढीपाडव्या दिवशी कडुनिंबाची पाने, डाळ, खोबरं आणि गूळ हे एकत्र करून खायला देतात, यामुळे शरीरातील थंडावा राखला. 

 गुढीपाडव्यापासून,पुर्ण उन्हाळ्याच्या दिवसात, रोज किमान दोन तरी पाने कडूलिंबाची खावीत, यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो.

 रामायणामध्ये,  भगवान श्रीराम हे 14 वर्षाचा वनवास संपवून, आयोध्येला परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागता साठी सर्व आयोध्यानगरी दारात गुढ्या उभारून, आंगणात रांगोळी काढून, दाराला तोरण बांधून, सजवण्यात आली. तो दिवस होता, चैत्र शुक्ल प्रतिपदा. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा होऊ लागला.म्हणूनच, घरोघरी गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा करतात.

 गुढीपाडवा सण कसा साजरा करतात- 

गुढीपाडव्याच्या साधारण आठ ते दहा दिवस आधीच घरोघरी तयारीला सुरुवात होते. यामध्ये सर्व घराची साफसफाई केली जाते.

 गुढीपाडव्याच्या चार दिवस आधी गावाकडे, घरातील पुरुष मंडळी शेतातून गुढीची काठी आणतात. गुढीची ही काठी बांबूची असते. शहरांमध्ये या काठ्या चौकात चार दिवस आधीच विकायला येतात .

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासूनच घरातील सर्वजण तयारीला लागतात. घरातील स्त्रिया पारंपारिक वेषात तयार होतात. घर तसेच अंगण साफ करून घेतात. दारात छान रांगोळी घालतात. प्रसन्न मनाने या दिवसाची सुरुवात होते.

 यानंतर घरातील जाणकार पुरुष मंडळी पारंपारिक पोशाखात तयार झाल्यानंतर, गुढी उभारायला सुरुवात करतात. घरातील समोरच्या दरवाजाजवळ ही काठी आणून प्रथम ती स्वच्छ धुऊन घेतली जाते. तिला पाच, सात किंवा नऊ ठिकाणी कडुलिंबाच्या डाळ्या बांधल्या जातात. त्या जवळच हळदी कुंकवाच्या टिकल्या लावल्या जातात. बांबूच्या काठीच्या शेंड्याला नवा कपडा, फुलांची माळ, साखरेची माळ आणि लिंबाच्या डहाळ्या एकत्र करून बांधतात. त्यावर तांब्या लावतात. तांब्याला हळदी कुंकू लावतात.ही सर्व तयारी करून गुढी तयार होते. घरातील मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला पाटावर ही गुढी उभी केली जाते. पाठाच्या आजूबाजूला रांगोळी काढले जाते. पाठ हा छान फुलांनी सजवला जातो. गुढीची काठी ही घराला व्यवस्थित बांधली जाते. आनंदाने गुढी उभी केली जाते.

 गुढीपाडव्या दिवशी घरामध्ये पुरणपोळीच्या भोजनाचा बेत असतो. सकाळपासूनच घरातील स्त्रिया यासाठी तयारी करत असतात. गुढी उभारल्यानंतर, गुढीची यथासांग पुजा केली जाते. गुढीला पारंपारिक पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. यानंतर घरातील सर्वजण एकत्र बसून पुरणपोळीचा आस्वाद घेतात.

सायंकाळी, पुन्हा गुढीची विधिवत पुजा करून, गुढीला नैवैद्य दाखवून, गुढी उतरवली जाते.

 प्रत्येक ग्रामीण, तसेच शहरी भागामध्ये, पारंपारिक पद्धतीत मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करतात.

 गुढीपाडव्याचे महत्त्व –

गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील पहिला व मोठा सण असल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे आनंदाचे प्रतीक असल्यामुळे घरोघरी मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करतात.

 गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे, या दिवशी सर्वजण महत्त्वाच्या कामांना सुरुवात करतात. या दिवशी खरेदीसाठी सर्वत्र गर्दी असते. सोने, विद्युत उपकरणे, नवीन गाड्या तसेच नवीन घर यांची खरेदी केली जाते.

 शेतकरी आपल्या शेतीच्या कामाची सुरुवात या दिवसापासून करतात. व्यापारी वर्गातही गुढीपाडवा या सणाला खास महत्त्व आहे.

काही पारंपारिक प्रथा

 या दिवशी रूढीपरंपरेनुसार ग्रामदेवतांची पूजा केली जाते. पालखी, प्रदक्षिणा, ग्रामदेवतेच दंडवत इत्यादी देवकार्य पुर्ण विधीवत संपन्न होतात.

 सायंकाळच्या वेळेस सर्व गावकरी एकत्र जमून, ग्रामदेवतेच्या सासनकाठीची मिरवणूक काढतात. सासनकाठी म्हणजे 25 ते 30 फूट उंचीचा बांबू होय. या काठीच्या टोकापासून ते पुर्ण काठीला लाल रंगाच्या पताका बांधून, फुलांच्या माळा सोबतच कडुलिंबाच्या डहाळ्या बांधून, ती सजवली जाते. तिची विधिवत पूजा केली जाते. मग ही सासनकाठी वाजत गाजत, मिरवणूक काढून, मंदिराकडे नेली जाते. 

सदरचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर, गावच्या चावडीवर सर्व जाणकार मंडळी एकत्र जमून, पाडवा वाचन करतात. यामध्ये सदरचे वर्ष कसे असेल, पेरणीचे मुहूर्त, पाऊस पाणी, यासह वर्षभराचे अंदाज कथन केले जातात.

 शेतीची कामे-

 गुढीपाडव्यानंतर एखादा वळवाचा पाऊस पडतो. हा पाऊस, शेतकर्यांना, शेतीच्या मशागतीसाठी फार उपयोगी असतो. पेरणीपूर्वीच्या सर्व मशागतीस यामुळे सुरुवात होते.

 समारोप-

 असा हा, मराठी नव वर्षातला पहिला सण म्हणजे, गुढीपाडवा होय. सर्वत्र मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. 

Leave a Comment

Pin It on Pinterest

Share This