उपवास का व कसा करावा (उत्सवाचे महत्त्व)

आपल्या सर्वांचा आवडीचा वार म्हणजे रविवार. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. आठवडाभर कामासाठी दगदग आणि धावपळ केल्यानंतर, एक दिवस निवांत विश्रांती घेण्यासाठी रविवारची सुट्टी असते. रविवार म्हणजे  मौज, मस्ती आणि मज्जा.

आठवड्यातील सहा दिवस काम केल्यानंतर, एक दिवस आराम करता यावा, म्हणून आपण रविवारची आतुरतेने वाट पाहत असतो. पण हाच आराम आपल्या शरीरातील काही अवयवांना मिळावा, असा विचार आपण कधी करतो का? 

रविवारी एक दिवस सुट्टी घेऊन, आपण पुन्हा नव्याने आठवड्याची सुरुवात करतो. तशीच गरज असते आपल्या पचनसंस्थेला. यासाठी महत्त्वाचा ठरतो तो उपवास. आपल्या शरीरातील पचनक्रियेला आराम देण्यासाठी उपवास गरजेचा आहे.

 पचनसंस्थेचे कार्य-

 आपण जन्मल्यापासून आपल्या शरीरातील विविध घटक आपल्यासाठी अविरत कार्यरत असतात. आपल्या शरीरात विविध अवयव आहेत, त्यांची कार्य निरनिराळी आहेत. आपल्या शरीरातील अवयवांची कार्य जरी निराळी असली, तरी ती एकमेकांना पूरक आहेत. आपल्या शरीरातील कोणताच अवयव स्वयंपूर्ण नाही. प्रत्येक अवयव हा इतर अवयवांवर अवलंबून आहे.

 आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचं विशिष्ट असं महत्त्व आहे. यातीलच एक महत्त्वाचा अवयव म्हणजे आपली पचनसंस्था. आपण जे खातो, ते सर्व पचवून, त्यावर प्रक्रिया करून, त्यापासून रक्त तयार करून, ते इतर अवयवांना पुरवणे हे पचनसंस्थेचे काम आहे. पचन संस्थेचे हे काम अखंडपणे चालू असते.

वारंवार खाणं हे शरीरासाठी अपायकारक आहे. आपण जितकं खाऊ, तितका वेळ ते अन्न पचवण्यासाठी खर्च होतो. यामुळे शरीरातील इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. मग अनेक छोट्या-मोठ्या तक्रारी सुरू होतात जसे की, वजन वाढणे, अपचन, जळजळ, स्थूलपणा, निरुत्साही वाटणे, वारंवार थकवा येणे, इत्यादी.

 उपवासाचे महत्त्व-

 उपवास म्हणजे एका ठराविक वेळी किंवा ठराविक काळासाठी अन्नग्रहण न करणे.

 आपण जेव्हा उपवास करतो, तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जा ही पचनक्रियेवरती खर्च होत नाही, तर ती दुसऱ्या कामासाठी वापरली जाते. आता, आपल्या शरीरातील दुसरी कामे म्हणजे, कोणती कामे? तर आपल्या शरीराच्या दुरुस्तीचे काम. उपवासावेळी आपल्या शरीरातील अगदी लहानातल्या लहान ऊती साफ किंवा दुरुस्त केल्या जातात.

 यामुळे आपल्या शरीरातील छोट्या छोट्या तक्रारी नाहीशा होतात. आपण कमी आजारी पडतो, आपली पचनसंस्था सुधारते, आपले वजन कमी होते, केसांच्या तक्रारी दूर होतात, तसेच शरीर हलकं होतं आणि त्वचाही निखरते.

 आपण उपवासात जर नियमितता ठेवली, तर बरेचसे गंभीर आजारही बहुतांश वेळा कमी होऊ शकतात. गंभीर आजार पूर्ण बरे जरी झाले नाहीत, तरी त्यांची तीव्रता किंवा यापासून होणारा त्रास कमी होऊ शकतो. यामुळे औषधांचा वापर कमी होऊन, त्यांचे शरीरावरचे इतर दुष्परिणाम कमी होतील.

उपवासाचे महत्त्व हा वरवरचा विषय नाही. याच विषयावरती, प्रदीर्घ काम करणारे, जपानचे जीवशास्त्राचे शास्त्रज्ञ, यांना जागतिक दर्जाचा नोबेल पुरस्कार, 2016 मध्ये, प्रदान करण्यात आला.

 अगदी सोप्या भाषेत एक उदाहरण द्यायचं, तर आपण जेव्हा आजारी पडतो, तेव्हा आपली खायची इच्छा होत नाही. याचं कारण म्हणजे आपल् शरीर प्राथमिक स्तरावर स्वतःच शरीर दुरुस्तीचे काम सुरू करते. यामुळे शरीरातील ऊर्जेचे पूर्ण लक्ष शरीराच्या दुरुस्तीवर केंद्रित होते. म्हणजेच आजारपण कमी करण्यासाठी म्हणून या दिवसात भूक कमी होते. डॉक्टर सुद्धा हलका आहार घ्यायला सांगतात.

 धार्मिक महत्त्व-

 उपवासाबद्दल अगदी प्राचीन काळापासून बोलले जात आहे. प्राचीन वेदांमध्ये उपवासाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. विविध धर्मांमध्ये उपवासाचे महत्त्व सांगितले आहे. हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे उपवास सांगण्यात आले आहेत. तर मुस्लिम धर्मामध्ये रमजान महिन्यात उपवास करतात. बौद्ध धर्मात, बौद्ध भिख्खू, दुपारनंतर जेवत नाहीत.

 वैज्ञानिक  दृष्टीकोन-

 आधुनिकता आणि प्रगती यांच्या नावाखाली, आपण आपल्या बऱ्याच प्राचीन परंपरा पाळायच्या बंद केल्या आहेत. हिंदू धर्मात काही ठराविक दिवशी उपवास सुचवले आहेत, पण आपण अंधश्रद्धेपोटी हे नाकारतो. तर त्यामागे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत, हे आपण विचारात घेत नाही.

 काही दिवशी, नैसर्गिकरित्या असे बदल होतात की, नैसर्गिकपणे आपली भूक मंदावते. अशा  दिवशी उपवास करा, असं आपल्याला प्राचीन वेदांमध्ये  सांगण्यात आलं आहे. यामुळे शरीराला कोणताही त्रास न होता, नैसर्गिकरित्या शरीर दुरुस्तीचे काम पूर्ण होते. तो दिवस म्हणजे एकादशीचा.

 तसेच निसर्ग जेव्हा, एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत प्रवेश करतो, तेव्हा वातावरणात काही बदल होतात, वातावरणातील या बदलांशी जुळवून घेता याव, तसेच हे बदल शरीराला अपायकारक ठरू नयेत, यासाठी सुद्धा उपवास सुचवण्यात आले आहेत. म्हणूनच आपल्याकडे दोनदा नवरात्री साजऱ्या होतात. एक चैत्र नवरात्री तर दुसऱ्या शारदीय नवरात्री.

 उपवासाचे प्रकार-

 उपवास हा वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. आपल्या शरीराला जे जमेल त्या पद्धतीने आपण उपवास करावा. साधारणपणे खालील प्रकारे आपण उपवास करू शकतो-

  •  फक्त सकाळी जेवणे, संध्याकाळी न जेवणे.
  •  एखादा आठवडा जेवणात भात न खाणे.
  •  एखाद्या आठवड्यात जेवणात डाळी न घेणे.
  •  एखादा आठवडा फक्त पोळी भाजीच खाणं.
  •  एखादा आठवडा जेवणात मीठ न वापरणे.
  •  आठवड्यातला एक दिवस पूर्णपणे उपवास करणे.
  •  संध्याकाळी सूर्यास्त आधी जेवणे.
  •  एकादशीचा उपवास करणे.
  •  नवरात्रीचे उपवास करणे.

 या किंवा यासारख्या काही गोष्टींचा उपयोग करून आपण उपवास करू शकतो.

 उपवास सोडण्याचे नियम-

 उपवास करण्याचे जसे नियम आहेत, तसेच काही नियम उपवास सोडण्यासाठी सुद्धा आहेत. उपवास सोडल्यावर, लगेच भरपूर खाल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. आपण जेव्हा उपवास धरतो, तेव्हा ठराविक वेळेसाठी आपण काही अन्नग्रहण करत नाही, पण जेव्हा आपण उपवास सोडतो, तेव्हा अचानक भरपूर खाल्ले, तर पचनसंस्था बिघडू शकते.

 यामुळेच उपवास सोडताना आधी पाणी किंवा लिंबू पाणी प्यावे. यानंतर एखादे फळ खावे किंवा हलकं अन्नग्रहण करावे. यानंतर थोड्यावेळाने जेवावे.

 आपण रात्री झोपतो त्या वेळात आपण काहीच खात नाही. म्हणजे जवळपास नऊ ते दहा तास आपण काही खात नाही. हा ही एक प्रकारचा उपवास आहे. म्हणून सकाळी उठल्यावर, आधी एक ग्लास कोमट पाणी प्या, असे म्हणतात.

 उपवास कोणी करू नये-

 उपवास आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून तो सगळ्यांनीच केला पाहिजे असं नाही. काही व्यक्तींसाठी उपवास पूर्णपणे वर्ज आहे. जसे की लहान मुले, गर्भवती महिला, आणि आजारी माणसं यांनी उपवास करणे फायदेशीर नाही.

 उपवासाबद्दलची उदासीनता-

 उपवास आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे आपण बघितलं. पण तरीही उपवासाबद्दल आजही, बहुतांश उदासीनता दिसून येते.

 लोकांमध्ये उपवासाबद्दल काही अफवा आहेत, जसे की उपवासामुळे कमजोरी येते, अशक्तपणा येतो, चक्कर येते, शरीराच्या हालचाली मंदावतात इत्यादी….

 चुकीच्या पद्धतीने उपवास केला, तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. पण जर योग्य पद्धतीने उपवास केला तर त्याचे फायदे आपल्याला मिळतात.

 बरेचसे खेळाडू सुद्धा उपवास करतात. त्यांना तर खूप शारीरिक मेहनत करावी लागते.

 समारोप- 

 उपवास ही आपली एक प्राचीन परंपरा आहे. यामुळे आपल्या शरीरावर तसेच मनावर, खोलवर चांगले परिणाम होतात. ज्याचा आपल्याला फायदाच होतो.

 उपवास फायदेशीर आहेत म्हणून किंवा कोणीतरी सांगितलेत म्हणून, आपण जबरदस्तीने उपवास करणे योग्य नाही. उपवास हा मनापासून आणि कोणतेही दडपण न घेता केला, तर आपल्याला त्याचा भरपूर फायदा होईल.

Leave a Comment

Pin It on Pinterest

Share This