चैत्र महिना संपूर्ण माहिती (chaitra month Information)

मनाला चैतन्य आणि नवीन उभारी देणारा महिना म्हणजे चैत्र महिना होय. आयुष्यात कितीही संकट आली तरी, आशेचा एक किरण नेहमी असतोच हेच जणू चैत्र महिना सांगत असतो. चैत्र महिन्यात उन्हाचे प्रमाण वाढते, वातावरणातील उष्मा वाढायला सुरुवात होते, पण या महिन्यात निसर्गातील बदल इतके आल्हादायक असतात की, मन प्रसन्न होतेच.

 मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते. चैत्र महिना हा मराठी कालगणनेतला पहिला महिना आहे.चैत्र महिना हा वसंत ऋतूत येतो. मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान चैत्र महिना असतो.

 चैत्र महिन्यात येणारे निसर्गातील बदल- 

 म्हणतात ना, चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा. फळांचा राजा असणारा आंबा या महिन्यात मोहरायला सुरुवात होते. सगळीकडे आंबेमोहराचा वास दरवळत असतो. सर्वांना हव्याहव्याशा  वाटणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या कैऱ्यांपासून विविध पदार्थ या महिन्यात बनवले जातात. उष्ण वातावरणात मनाला थंडावा देणार कैरीचं पन्ह याच महिन्यात बनत. आंब्याचं लोणचं, कैरीची चटणी, डाळ कैरी असे पदार्थ चैत्र महिन्यात चवीने खाल्ले जातात.   

डोंगरात, कड्या कपारीतील करवंदाच्या जाळ्या या चैत्र महिन्यात मोहरायला लागतात. काही ठिकाणी कच्च्या करवंदाची चटणी जेवणाची लज्जत वाढवते. करवंदा सोबतच चैत्रात बहर येतो तो जांभळाच्या झाडांना.

कडक उन्हातही फुललेला लाल भडक गुलमोहर डोळ्यांना सुखावतो. रस्त्यावर फुललेल्या गुलमोहराचे  सडे पडतात. पिवळा धमक बहावा सुद्धा या महिन्यात बहरतो. या पिवळ्या धमक  फुलांचे सडेच्या सडे पडतात. वर्षातून एकदाच येणाऱ्या या लाल  पिवळ्या  फुलांनी वातावरण जणू मोहरून जाते. डेरेदार पळस सुद्धा या महिन्यात बहरतो. 

आपल्या वासाने मनमोहुन घेणारा मोगरा याच महिन्यात फुलायला लागतो. या दिवसात मोगऱ्याचे गजरे घालण्याचा आनंद काही वेगळाच.

 झाडांना आलेल्या पानगळीनंतर वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. चैत्र महिन्यात बऱ्याच फुलझाडांना मोहर येतो,  तसेच काही फळझाडे ही या महिन्यात बहरतात. कोकिळेचे मधुर गुंजन या महिन्यात आपल्याला ऐकायला मिळते.

 चैत्र महिन्यात येणारे सण-

 चैत्र महिन्याची सुरुवातच गुढीपाडवा या सणाने होते. मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. सर्वत्र मोठ्या आनंदात व उत्साहात गुढीपाडवा सण साजरा होतो. गुढीपाडव्याच्या दिवशीच चैत्र नवरात्रींना आरंभ होतो. चैत्र शुक्ल नवमीला श्रीराम नवमी साजरी होते. श्रीरामनवमी हा सोहळा मोठ्या श्रद्धेने, विविध ठिकाणी साजरा होतो. या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

 चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने सर्वत्र साजरी करतात. हनुमान जयंती दिवशी हनुमान मंदिरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. 

चैत्र महिन्यात वरील तीन प्रमुख सण येतात.

 गावच्या जत्रा-

 चैत्र महिना सुरू झाला की गावच्या जत्रांना सुरुवात होते. गावच्या ग्रामदेवतांच्या नावाने या जत्रा साजऱ्या केल्या जातात. प्रत्येक गावच्या जत्रा या ठराविक तिथींना साजरया होतात. बहुतांश गावांमध्ये या जत्रा मोठ्या उत्साहात साजरया होतात. 

काही गावांमध्ये गोड्या जेवणाची रंगत असते, तर काही ठिकाणी मांसाहारी जेवणाचा बेत असतो. वातावरणात वाढलेला उष्मा, अधून मधून उमटणारी वावटळ अशाही वातावरणात या जत्रा पार पडतात. जत्रेच्या आदल्या दिवशी जागर असतो. या दिवशी विविध देवकार्य संपन्न होतात. जत्रेच्या मुख्य दिवशी सर्व ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने ग्रामदेवतेचे दर्शन घेतात. गावकरी गावाच्या जत्रेचे आमंत्रण नातेवाईक व मित्र परिवारांना देतात. जत्रेत सहभागी होण्यामागे सर्वांच्या गाठीभेटी घेणे हा एक हेतू असतो. गावच्या माहेरवाशीणी  या जत्रेसाठी मोठ्या आनंदाने आपल्या माहेरी येतात.

 जत्रेसाठी गावातील ग्रामदेवतेचे मंदिर विविध फुलांची आरास करून सजवतात. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करतात. जत्रेसाठी मंदिराजवळ विविध खाद्यपदार्थांचे तसेच खेळण्याचे स्टॉल असतात. गावातील सर्वजण मोठ्या आनंदाने या जत्रेत सहभागी होतात. 

शेतीची कामे- 

चैत्र महिन्यात शेतीतील पिकांच्या काढणीची बहुतांश कामे पूर्ण झालेली असतात. मग यानंतर शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात करतात. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून शेताला ऊन लागावे म्हणून ठेवतात. ऊन लागल्यामुळे मातीतील विविध बुरशी व किड नाहीशी होते. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी रान पुढील पिकांसाठी तयार करून ठेवतात.

परीक्षांचा मोसम-

 चैत्र महिना हा साधारण मार्च ते एप्रिल या महिन्यादरम्यान येतो. चैत्र महिन्यात उन्हाचे प्रमाण वाढते म्हणून सकाळच्या शाळांना सुरुवात होते.  हा काळ असतो मुलांच्या वार्षिक परीक्षांचा. कधी तोंडी परीक्षांची लगबग सुरू असते, तर कधी लेखी परीक्षांची धावपळ. चैत्र महिन्यात गावोगावीच्या जत्रा जत्रा सुरू होतात आणि शालेय वार्षिक परीक्षा ही यादरम्यान सुरू होतात, मुलांची मात्र यात तारेवरची कसरत होते. वार्षिक परीक्षा झाली की मुलांना वेध लागतात ते उन्हाळी सुट्टीचे. 

समारोप-

 असा हा चैत्र महिना, वेगवेगळ्या फुला- फळांनी बहरलेला.  उन्हाने तापणारा तरी मनाला थंडावा देणारा.

Leave a Comment

Pin It on Pinterest

Share This