‘’विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,
वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले….’’
शिक्षण न घेतल्यामुळे माणूस किती अधोगतीला जातो, हे अगदी समर्पक शब्दात वरील ओळीतून महात्मा फुलेंनी सांगितले आहे.
स्वातंत्रपूर्व काळात, महात्मा फुलेंनी अतिशय कठीण परिस्थितीत, सर्व स्तरावर आपले कार्य चालू ठेवले.
महात्मा जोतीबा फुले, हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून, सामाजिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या एका महान शक्तीचे नाव आहे. सुरक्षित चौकटीतले जीवन नाकारून, समाजाचा विरोध, शिव्या-शाप सहन करीत, जाणीवपूर्वक अंगीकारलेला वसा निर्भयतेने पुढे नेणारा, सामाजिक क्रांतीचा प्रणेता, म्हणजेच महात्मा जोतीबा फुले होय.
‘’जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले,
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा !’’
दुःखितांचे दुःख पाहून ज्याचे हृदय पिळवटून जाते, तोच खरा महात्मा. या संत तुकोबारायांच्या वचनांना अंगीकारणारा, शूद्र आणि पददलितांच्या दुःखाने व्यतीत होणारा, त्यांच्या सुखासाठी हक्काने झटणारा एक महात्मा उदयास आला, तो म्हणजे क्रांतीसुर्य जोतीबा गोविंदराव फुले.
.
महात्मा फुलेंचे बालपण-
गोविंदराव फुले व चिमणाबाई फुले यांचे सुपुत्र म्हणजे जोतीबा. जोतीबा यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी, पुणे येथील धनकवडी येथे झाला. जोतिबा केवळ दहा महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा सांभाळ कसा करावा, हा प्रश्न त्यांच्या वडिलांसमोर उभा राहिला. तेव्हा हडपसर येथे राहणाऱ्या, सगुणाबाई क्षीरसागर यांनी जोतिबांचा सांभाळ केला. सगुणाबाई या गोविंदराव फुले यांच्या मानलेल्या बहीण होत्या.
वयाच्या सातव्या वर्षा पासून जोतिबांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. पण त्याकाळी असणाऱ्या सामाजिक विषमतेमुळे, शिक्षणास पोषक वातावरण नव्हते, यामुळे जोतिबांचे शिक्षण त्यांच्या वडिलांनी थांबवले. परंतु जोतिबांची चिंतनशीलता व कुशाग्र बुद्धी पाहून, त्यांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफ्फारबेग मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लिजीट साहेब यांच्या सल्ल्याने, त्यांचे शिक्षण वयाच्या चौदाव्या वर्षी, पुण्यातील मिशनरी शाळेत खऱ्या अर्थाने पुन्हा सुरु झाले.
इसवी सन १८४० मध्ये, जोतिबांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. त्यावेळी जोतिबा १३ वर्षांचे व सावित्रीबाई ९ वर्षांच्या होत्या. साताऱ्यातल्या नायगाव या गावी असणाऱ्या खंडोजी झगडे पाटील, यांच्या सावित्रीबाई या कन्या होत्या.
सावित्रीबाईंना त्यावेळी अक्षर ओळखही नव्हती. जोतिबांनी सावित्रीबाई यांना शिकवून स्त्री शिक्षणाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली.
मिशनरी शाळेत असताना, जोतीबांनी संत तुकाराम, शिवाजी महाराज, मार्टिन ल्युथर यांची जीवनचरित्र वाचली. यामुळे अन्याय विरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्याचप्रमाणे युरोपियन लेखक थॉमस पेन यांच्या, ‘’राईटस ऑफ मॅन’’ या पुस्तकाचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला.
१८४७ साली, लहुजी साळवे या अस्पृश्य समाजातील व्यक्तीकडून त्यांनी नेमबाजी व दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.
याच काळात त्यांचे व्यक्तिमत्व तयार होत होते. क्रांतिकारी विचार त्यांच्या मनात तयार झाले होते.
जोतिबांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या दोन घटना-
ज्योतिराव आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता, वरातीमध्ये ब्राह्मणांनी त्यांचा शूद्र म्हणून अपमान केला व त्यांना वराती मागून यायला सांगितले. या घटनेमुळे त्यांच्या मनात सामाजिक विषमते विरुद्ध चिड निर्माण झाली. हा सामाजिक विषमतेचा कलंक नष्ट करण्यासाठी शिक्षण हेच साधन आहे, हे त्यांनी ठरवले व त्यातूनच एका महान सामाजिक परिवर्तनाला सुरुवात झाली.
याच काळात त्यांनी, वयाच्या नवव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या गुरुकन्येचे केशवपन करून, तिला विद्रूप केल्याची घटना पाहिली. त्यातूनच स्त्री उद्धाराची युगप्रवर्तक चळवळ त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांच्या समवेत खंबीरपणे चालू केली.
महात्मा ज्योतिबा फुलेंचे शैक्षणिक कार्य–
अज्ञानरूपी अंधकाराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे साधन नाही. शिक्षकाने मनुष्याला सत्य-असत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. शिक्षण हे सुधारणेचे मूळ आहे. त्यातून स्वाभिमानाची जाणीव जागृत होते. त्यातल्या त्यात स्त्रियांचे शिक्षण म्हणजे पुढे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण, असे ज्योतिरावांचे ठाम मत होते.
‘’जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’’ या त्यांच्या प्रगल्भ वैचारिक प्रणालीतूनच, ३ ऑगस्ट १८४८ साली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, महात्मा फुलेंनी पुण्यातील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
जोतिबांच्या या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. सावित्रीबाई यांनी शिक्षिका, मुख्याध्यापिका व संचालिका अशा तिहेरी भूमिका मोठ्या कुशलतेने व खंबीरपणे पार पाडून स्त्री शिक्षण घरोघरी पोहोचवले.
पण अल्पकाळातच ही शाळा आर्थिक अडचणीमुळे बंद पडले. जोतिबांच्या सहकार्यांनी केलेल्या मदतीने ही शाळा पुन्हा सुरू झाली.
- १७ सप्टेंबर १८५१ ला रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली गेली.
- १५ मार्च १८५२ मध्ये वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा निघाली.
- १८४८ ते १८५२ या चार वर्षात महात्मा फुलेंनी एकूण १८ शाळा स्थापन केल्या
महात्मा फुलेंनी फक्त शाळा चालू केल्या नाहीत, तर मुलींच्या शाळांना अनुदान मिळावे म्हणून, राज्यपालांना पत्र देखील पाठवले.
१९ मे १८५२ मध्ये, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी समाजाचा अत्यंत विरोध पत्करून महात्मा फुलेंनी पुण्यातील वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले गेले.
या दरम्यान त्यांनी पुना लायब्ररीची स्थापना केली.
१६ नोव्हेंबर १८५२ या वर्षी, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल, पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच अस्पृश्य व स्त्री शिक्षणासाठी ब्रिटिशांनी त्यांना दक्षिणा प्राईज फंडाद्वारे मदतही केली.
१८५३ मध्ये महात्मा फुलेंनी मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे दलित लोकांना शिक्षण दिले जायचे.
पुढे १८५५ मध्ये, त्यांनी प्रौढशिक्षणाला सुरुवात केली. प्रौढांसाठीची पहिली रात्र शाळा त्यांनी काढली. या शाळेत सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना मुक्त प्रवेश होता.
१८५२ साली हंटर आयोगाला दिलेल्या शिफारशीत, जोतीबा म्हणाले होते की, भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात यावे.
महात्मा ज्योतिबा फुलेंचे स्त्री उद्धारक कार्य-
सती प्रथा, बालविवाह, केशवपन इत्यादी कुप्रथांनी काळवंटून टाकलेले स्त्रीजीवन पाहून, महात्मा फुलेंचे हृदय पिळवटून निघाले होते. स्त्रियांवरील या अन्यायाला व अत्याचाराला नष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक कार्य केली.
- बालविवाहामुळे अनेक स्त्रिया विधवा होत. अशावेळी लहान वयातच त्यांना सती जाव लागायचं किंवा मग अशा स्त्रियांनवर तोनात शारीरिक व मानसिक अत्याचार केले जायचे, त्यात या स्त्रिया निरक्षर असल्यामुळे, त्यांच्यासाठी त्यांचे पुढील आयुष्य अत्यंत हलाखीचे होई. यासाठीच १८ जानेवारी १८६३ मध्ये, आपल्या राहत्या घरी जोतिबांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. पुढे पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना केली गेली.
- या प्रतिबंधक गृहाला जोडून सुतिकागृह व अनाथ बालकाश्रमाची स्थापना करून विधवांची बाळंतपणे व नवजात बालकांचे संगोपन येथे केले जात होते.
- १८६४ मध्ये पुण्यातील गोखले बागेत, पहिला पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला.
- विधवांचे केशवपन करण्याची अमानुष प्रथा रोखण्यासाठी १८६५ मध्ये, तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे जोतिबांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला.
- १८७३ मध्ये काशीबाई नातू या एका विधवा ब्राम्हण स्त्रीच्या मुलाला त्यांनी दत्तक घेऊन, त्याचे नाव यशवंत ठेवले. याच मुलाला पुढे उच्च शिक्षण देऊन त्यांनी डॉक्टर बनवले.
महात्मा ज्योतिबा फुलेंचे सामाजिक कार्य-
- सामाजिक व धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी, सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्याकाळात त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या.
- १८६८ मध्ये, स्वतःच्या राहत्या घराचा पाण्याचा हौद जोतिबांनी अस्पृश्यांसाठी खुला केला.यामुळे जोतीबांवर बहिष्कार टाकण्यात आला, सावित्रीबाई सोबत जोतिबांनी घर सोडलं, पण आपले कार्य चालूच ठेवले.
- १८६८ मध्ये जोतिबांच्या वडिलांचे निधन झाले. त्याकाळी जोतिबांनी वडिलांच्या श्राद्धाचे जेवण गोरगरिबांना दिले, तसेच गरजू विद्यार्थांना पुस्तके वाटली.
- १८७७ मध्ये धनकवडी येथे जोतिबांनी सावित्रीबाई सोबत दुष्काळग्रस्तांसाठी कॅम्प उभारला. तसेच व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली.
महात्मा ज्योतिबा फुले चे शेतकर्यांसाठीचे कार्य-
भूमिपुत्राचा सन्मान हाच देशाचा सन्मान आहे.जर देशातील शेतकरी सुखी असेल तरच देश सुखी होईल, म्हणून ज्योतिबांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक चळवळी राबवल्या.
जलनियोजन, भूमी साक्षरता, कर्जमुक्ती, कृषी नियोजन,कृषी संशोधन, शेतीचे आधुनिकीकरण, शेतीला पूरक जोडधंदे, जातिवंत जनावरांची पैदास इत्यादी दूरदर्शी योजना सुचवून, त्याचे महत्व शेतकरी बांधवांना जोतिबांनी पटवून दिले.
कर्जामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्याची सावकारी पाशातून सुटका व्हावी, म्हणून अहमदनगर व पुणे येथे त्यांनी १८७५ मध्ये खत फोडीचे बंडही पुकारले.
व्हिक्टोरिया महाराणीचा ब्रिटिश राजपुत्र ड्युक ऑफ कॅनॉट यांच्या पुणे भेटी प्रसंगी आयोजित समारंभात, महात्मा फुलेंनी साध्या शेतकरी वेशात जाऊन तिथे त्यांनी खूप महत्त्वपूर्ण भाषण केले.
यावेळी जोतीबा राजपुत्रांना म्हणतात, ‘’आपल्यासमोर रेशमी कपडे नी महागडे अलंकार परिधान करून आलेले लोक पाहून, भारतीय प्रजे विषयी आपले मत बनवू नये. खरा हिंदुस्तान पाहावयाचा असेल, तर माझ्यासोबत खेड्यात चला.’’
महात्मा ज्योतिबा फुले चे कामगारांसाठीचे कार्य-
१८७६ साली जोतिबांनी एक कंन्स्टकशन कंपनी काढली होती, या कंपनी मार्फत मुंबई येथे अनेक कापडगिरण्यांचे काम करण्यात आले. यावेळी जोतिबांच्या लक्षात आले की, कामगार वर्गाची संख्या मोठी आहे, पण हा वर्ग असंघटीत आहे. तसेच त्यांच्या समस्याही खूप आहेत.
म्हणून जोतिबांच्या मार्गदर्शनातूनच १८८० मध्ये, नारायण मेधाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली मजदूर संघटना, बॉम्बे मिल हॅन्ड असोसिएशनची स्थापना मुंबई येथे केली.
या मजदूर संघटने मार्फत, कामगार वर्गाला संघटीत करून, त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या गेल्या.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्य-
२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुलेंनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सत्यशोधक समाजाच्या मार्फत जोतिबांनी अनेक महत्वाची कार्य पूर्ण केली. यातील काही महत्वाची कामे खालीलप्रमाणे-
समाज व्यवस्था ही एका विशीष्ट वर्गाच्या हाती न राहता, सर्व समाजघटकांना तेथे समान न्याय मिळावा, यासाठी जोतिबांनी काम केले.
दलित व स्त्रिया यांच्यावरील अन्याय दूर करून त्यांना साक्षर केले.
पुरोहितांची कोणतीही मदत न घेता सर्व धार्मिक विधी करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. यासाठी पुरोहितांची स्वतंत्र शाळा सुरु केल्या.
४ फेब्रुवारी १८८९ मध्ये सत्यशोधक पद्धतीनेच जोतिबांनी त्यांचा मुलगा यशवंत याचा विवाह लक्ष्मी ग्यानबा सासणे या मुलीशी, सत्यशोधक पद्धतीने लावला.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे औद्योगिक कार्य
महात्मा फुले हे थोर शिक्षण तज्ञ होते, त्याचबरोबर ते एक यशस्वी उद्योगपती, अर्थतज्ञ व कार्यकारी संचालक देखील होते. तसेच त्याकाळात जोतीबा शेअर मार्केटचे तज्ञ अभ्यासक देखील होते.
१८७४ साली, पुणे येथे त्यांनी पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीची स्थापना केली. या कंपनीद्वारे बरीच मोठी आणि भव्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये पुणे-सातारा रोडवरील कात्रज चा बोगदा, येरवड्याचा पूल, खडकवासला धरणाचा कालवा, मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल, परळीचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापड गिरण्या, भंडारदरा जलाशय ही काही महत्त्वाची कामे या कंपनीमार्फत पूर्ण करण्यात आली.
या कंपनीतून मिळालेला फायदा ज्योतिबा फुले यांनी मुक्तहस्ते सामाजिक कार्यासाठी वापरला.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे राजकीय कार्य
महात्मा फुले यांनी त्यांच्या कार्याचा ठसा राजकारणात देखील उमटवला होता. १८७६ ते १८८३ या काळात ते पुण्याचे आयुक्त होते.
याच दरम्यान त्यांनी दारूची दुकाने उघडण्यासाठी सरकारने परवाने देऊ नयेत, म्हणून गव्हर्नरला पत्र लिहिले होते. तसेच राजकारणात जो वायफळ पैसा खर्च होतो, तो विद्यादानाच्या कार्यासाठी वापरला जावा असेही त्यांनी सुचवले होते. .
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्वाचे काही महत्वाचे पैलु
महात्मा फुले यांची म्हणजेच सत्यशोधक समाजाची प्रिंटिंग प्रेस होती, या प्रिंटिंग प्रेस मध्ये त्यांनी सामाजिक उद्दबोधानासाठी बरीच पुस्तके छापून तयार केली.
जून १८६९ मध्ये, महात्मा फुलेंनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी शिल्प शोधून काढले. तेथे शिवस्मारक उभे करून भारतातली पहिली शिवजयंती त्यांनी सुरू केली. त्यासाठी 908 ओळींचा पोवाडा रचुन शिवरायांच्या मानवतावादी विचारांची महती यातून त्यांनी सांगितली आहे.
महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलु म्हणजे, त्यांनी त्यांच्या कार्यात कोणत्याही व्यक्तीला कधीच विरोध केला नाही, जरी विचार पटले नसले तरीही. याचेच उदाहरण द्यायचे तर,
- सप्टेंबर १८७५ साली, पुण्यामध्ये न्या. म. गो. रानडे यांनी, स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढली. या मिरवणुकीला जोतिबांनी संरक्षण दिले खरे, पण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारांना जोतिबांचा विरोध होता.
- १८८२ साली, लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या विरोधात कोल्हापूर मध्ये खटला दाखल करण्यात आला, दोघांनाही अटक करण्यात आली, तेव्हा महात्मा फुले यांनी त्याकाळात १०,००० रुपये भरून त्यांना जमीन मंजूर करून दिला.
मुंबईतील भायखळ्याच्या मांडवी कोळीवाड्यातर्फे जोतीबा फुले यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी फुले यांना ‘’महात्मा’’ ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी पदवी देऊन सन्मानित करण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली पुस्तक
१८५५ साली जोतिबांनी पुण्यात लिहिलेले तृतीय रत्न हे त्यांचे पहिले नाटक होय. मराठीतले पहिले सामाजिक नाटक म्हणून हे ओळखले जाते.
जून १८६९ साली छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्यावर ९०८ ओळींचा पवाडा मुंबई येथे लिहला. तसेच याचवर्षी त्यांनी विद्याखात्यातील ब्राम्हण पंतोजी हा पवाडा पुणे येथे एका मासिकासाठी लिहला. जोतिबांचे एक प्रसिद्ध पद्य ब्राम्हणांचे कसब हे देखील याच वर्षी मुंबई येथे प्रकाशित झाले.
जून १८७३ साली पुणे येथे गुलामगिरी हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
१९ ऑक्टोंबर १८८२ साली हंटर शिक्षण आयोगापुढे जोतिबांनी निवेदन सादर केले. यात त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्तेवर भाष्य केल आहे.
१८ जुलै १८८३ साली पुण्यात जोतिबांनी शेतकऱ्याचा आसूड हा अपूर्व ग्रंथ लिहिला. शेतकर्यांच्या दुःखाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केला आहे.
१८८५ साली जोतिबांनी सत्सार अंक 1 व सत्सार अंक २ हे दोन अंक पुण्यातून प्रसिद्ध केले. ताराबाई शिंदे व पंडिता रमाबाई यांच्यावर केलेल्या टीकेला, या दोन अंकामधून चोख प्रतुत्तर दिले. तसेच याचवर्षी पुण्यातून प्रसिद्ध झालेल्या इशारा या पुस्तकातून त्यांनी आपले मत मांडले आहे.
१८८७ साली पुणे येथे जोतिबांनी सत्यशोधक सामाजोक्त मंगलाष्टकांसह सर्व पूजा विधी हे पुस्तक लिहिले. सत्यशोधक समाजोक्त विवाहविधींची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आली आहे. याचवर्षी जोतिबांनी अस्पृश्यांचे कैफियत हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्य समाजाचे वर्णन केले आहे. तसेच याचवर्षी जोतिबांनी अखंदाडी काव्यरचना हे पद्य लिहिले. या पद्यामधून सामाजिक व्यवस्तेचे वर्णन अभंग आणि पोवाडा यातून केले आहे.
१ एप्रिल १८८९ साली जोतिबांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. जोतिबांनी लिहिलेला हा शेवटचा ग्रंथ ठरला. १९८८ साली जोतिबांना अर्धांगवायू झाला, यामुळे त्यांच्या शरीराची उजवी बाजू विकलांग झाली, तरीही डाव्या हाताने लिहून हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. जोतिबांच्या निधानंतर त्यांचे पुत्र यशवंत यांनी तो ग्रंथ प्रकाशित केला.
निरोप-
अखेर ती काळरात्र आली, सामाजिक क्रांतीचे जनक असणाऱ्या महात्मा फुले यांचे २८ नोव्हेंबर १८९०ला, मध्यरात्री २ वाजता पक्षाघाताच्या प्रदीर्घ आजाराने, वयाच्या ६३ व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झाले.
व्यक्ती जरी आपल्या मधून निघून गेल्या, तरी त्यांचे विचार आपल्या मध्ये कायम राहतात. याचप्रमाणे महात्मा जोतीबा फुले जरी आपल्यामध्ये नसले, तरी त्यांचे विचार आजही आपल्यालासाठी प्रेरणादायी आहेत.
राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या समाजसुधारकांनी महात्मा फुले यांच्या कार्याने प्रेरित होऊन समाजसुधारणेचा वसा हाती घेतला, आणि समाजसुधारणेचे कार्य अखंड चालू ठेवले.
ज्याकाळात माणसांना बोलायचाही अधिकार नव्हता, त्याकाळी जोतिबांनी समाजाचा प्रचंड विरोध स्वीकारून सामाजिक परिवर्तनाला सुरुवात केली. यावरूनच जोतीबा किती असामान्य बुद्धीचे होते, हे दिसून येते.
महात्मा जोतीबा फुले यांना आमच्या टीम तर्फे शतशः नमन……