अनुक्रमणिका
भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या स्त्री शिक्षिका प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कृत्या, दलितांच्या कैवारी, समता चळवळीच्या प्रणेत्या, स्त्री मुक्तीच्या आघ प्रणेत्या, अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक म्हणजेच कृतीशील समाजसेविका सावित्रीबाई जोतीराव फुले होय.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी राष्ट्रविकासाचा उदात्त आणि अतिभव्य हेतू डोळ्यापुढे ठेऊन स्त्री शिक्षणास प्राधान्य देऊन महान क्रांतीकार्य केले या त्यांच्या क्रांतीकार्यात त्यांच्या पत्नीचा म्हणजेच सावित्रीबाई फुलेंचा सिंहाचा वाटा आहे.
असामान्य त्याग, कार्याप्रती असीम निष्ठा, अखंड परिश्रम, अतुलनिय धाडस, आणि अविचल मूल्यांची जपणूक करणाऱ्या सावित्रीबाई स्त्रीजातीस व समस्त मानवजातीसच एक प्रेरणादायी व वंदनीय व्यक्तीमत्व आहे.
सावित्रीबाईं फुलेचा जन्म व त्यांच्या शिक्षणाची सुरवात
सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील ‘नायगाव’ या गावी 3 जानेवारी १८३१ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. इ.स १८४० ला वयाच्या ९व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा जोतिराव फुलेंशी झाला, त्यावेळी जोतीरावांचे वय १३ वर्षे होते.
विवाहाच्या वेळेपर्यंत त्यांना अक्षरओळखही नव्हती पण जोतीरावांनी त्यांना शिकविले. सावित्रीबाईही मोठ्या जिद्दीने परिश्रमाने शिकल्या व एक प्रशिक्षित शिक्षिका झाल्या.
सावित्रीबाईंचे शैक्षणिक व सामाजिक कार्य
त्या काळात स्त्री संपूर्ण बंधनात होती. तिचे जीवन पशुसमान होते. या पशूत्वाच्या जगण्याला मनुष्यत्व देण्यासाठीचा पहिला प्रयत्न सावित्रीबाईंनी केला.
जोतीरावांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्याच्या ओसरीवर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना नियुक्त केलेआणि यापासूनच स्त्री शिक्षणाच्या महान पर्वाला सुरुवात झाली. पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका सावित्रीबाई स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ठरल्या.
याच काळात जातीभेदाच्या, विषमतेच्या श्रृंखला तोडण्यासाठी ‘शिक्षण’ हेच साधन आहे याची पुर्णपणे जाणीव असलेल्या जोतीरावांनी व सावित्रीबाईंनी १५ मे १८४८ ला पुण्यातच महारवाड्यात अस्पृश्यांच्या मुलामुलींसाठी दुसरी शाळा काढली व या शाळेत स्वतः सावित्रीबाईंनी शिक्षिकेचे काम केले.
१८४८ ते १८५२ या दरम्यान पुणे आणि सातारा परिसरात जवळपास १८ शाळा या दांपत्याने चालू केल्या या सर्व व्यवस्थापन सावित्रीबाई पाहत होत्या. संचालक, मुख्याध्यापिका आणि शिक्षिका असे तिहेरी कर्तव्य त्या तळमळीने पार पाडत होत्या. त्यामुळेच त्यांनी चालवलेल्या शाळांची प्रगती लक्षणीय होती.
त्यांच्या सेवाकार्याने स्त्री शिक्षणाचे नवे युग निर्माण केले. त्यांना समता , स्वातंत्र्य व बंधुत्वावर आधारित राष्ट्र घडवायचे होते. मुलींना शिक्षण देणे ही राष्ट्रघडणीच्या महान कार्याची सुरुवात होती.
आदर्श राष्ट्र घडवण्यासाठी आदर्श माता’ घडविण्याचे कार्य सावित्रीबाईंनी मोठ्या श्रद्धेने केले. हे कार्य करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. कारण त्याकाळी समाजात प्रचंड जातीभेद, विषमता होती व स्त्री-शुद्रांनी शिकणे हे समाजाला मान्यच नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगी दगड शेण यांचा मार खाऊन ही त्यांनी आपले कार्य शेवटपर्यंत पूर्ण केले.
या महान कार्यासाठी त्यांना बेघरही करण्यात आले तशा परिस्थितीतही त्यांनी समाजकार्यात तडजोड केली नाही.
शिक्षणाने मनुष्य आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण झाला पाहिजे असे फुले दांपत्याला वाटत होते त्यामुळे श्रमप्रधान शिक्षणावर त्यांचा भर होता. पेशवाईत जातीभेद विकोपाला आला होता तो संपवण्यासाठी ‘शिक्षण’ हाच मार्ग आहे. म्हणून शुद्रांसाठी शाळा काढून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव सावित्रीबाईंनी करून दिली.
प्रौढशिक्षणाची सुरवात ही सावित्रीबाईंनी व जोतीरांवानी करून अनेक पालकांना सुज्ञ बनवले त्याकाळी अस्पृश्यांना मुलभूत हक्कही नव्हते त्यांना सार्वजनिक पाणवढ्यावरून पाणीही घेता येत नव्हते त्यां काळात १८६८ मध्ये दोघांनी आपल्या घरातील पाण्याचा आड (हौद) अस्पृश्यांसाठी खुला केला.
अस्पृश्य स्त्रियांसाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना
सर्व जाती धर्माच्या स्त्रीयांसाठी सार्वजनिक तिळगुळाचा कार्यक्रम घेतला कारण यामुळे विषमता कमी होऊन समानता व एकी वाढावी हा त्यांचा हेतू होता.
समाजातील बारिक सारीक समस्यांकडे फुले दांपत्याचे लक्ष होते. त्याकाळी साथीच्या आजारात शेकडो मुली बालविधवा होत, जरठ-कुमारी विवाह होत त्यामुळे बालविधवांचे प्रमाण जास्त होते. निराश्रीत विधवा महिलांना आश्रय देऊन त्यांच्या मुलांचे संगोपन करण्यासाठी या दोघांनी २८ जानेवारी १८६३ ला ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’ ची स्थापना केली.
या गृहाला जोडून सुतिकागृह व अनाथ बालकाश्रम स्थापन केले. यामध्ये विधवांची बाळंतपणे व नवजात मुलांचे संगोपन सावित्रीबाईंनी केले अनेक विधवांचे पुनर्विवाह घडवून आणले तसेच विधवांचे केशवपन रोखण्यासाठी ‘न्हाव्यांचा’ संपही घडवून आणला अशा प्रकारे क्रांतीकारी कामे सावित्रीबाईंनी जोतीरावांच्या साथीने केली.
सावित्रीबाईं फुलेची साहित्यनिर्मिती
स्त्री – शुद्रांच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या सावित्रीबाई स्वतंत्र प्रज्ञेच्या प्रतिभाशाली कवयित्री होत्या, वक्त्या व लेखिका होत्या. त्यांचा ‘काव्यफुले’ हा कवितासंग्रह १८५४ ला प्रसिद्ध झाला, त्याचबरोबर ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हे जोतीरावांचे संक्षिप्त पद्यात्मक चरित्र त्यांनी लिहले. त्यांचे लेखन मूल्य गर्भ आशयाने समृद्ध व समाजोद्धाराच्या तळमळीने अभिमंत्रित केलेले विचारधन आहे.
सत्यशोधक समाजाच्या कार्यातील सहभाग
सावित्रीबाईंच्या प्रत्येक कृती मागे समाजकल्याणाची व्यापक व प्रबळ कळवळ होती सावित्रीबाईंचा “सत्यशोधक समाजाच्या” कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. या कार्याच्या प्रचारासाठी त्यांनी गावोगावी भ्रमंती केली व आपल्या प्रभावी भाषणांतून लोकांचे प्रबोधन केले. ‘उदयोग, विद्यादान सदाचरण ,व्यसने, कर्ज इ. विषयांवरची ही भाषणे अत्यंत उदबोधक होती.
त्याचबरोबर सर्वाना समान शिक्षणाचा अधिकार, दारूबंदी विवाहातील पुरोहितगिरीचे उच्चारण, साधीसोपी विवाह पद्धत, जातीभेद निर्मुलन इ. प्रकारची कामे सावित्रीबाई करत होत्या.
त्याचबरोबर १८७६ साली महाराष्ट्रात भयानक दुष्काळ पडला त्यावेळी दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी अन्नछत्र चालू केले तसेच गरिब मुलांसाठी ‘हिक्टोरिया बालाश्रम’ ची स्थापना केली. दुष्काळाच्या काळात आपल्या सहका-यांसोबत त्या रोज 2 हजार भाकरी थापून भुकेल्यांना खाऊ घालायच्या.
जोतीरावांच्या मृत्युनंतरही त्यांनी समाजसेवेचे व्रत चालू ठेवले. काशीबाई नावाच्या एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी त्याला सांभाळले त्यांच्यावर चांगले संस्कार केले. जोतीरावांच्या मृत्युसमयी त्या दत्तक मुलाला ‘यशवंत’ला अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांनी विरोध केल्यावर त्या स्वतः उठून एका हातात टिटवे दुसऱ्या हाताला यशवंतला घेऊन जोतीरावांचा अत्यंविधी धाडसाने पार पाडला.
प्लेगग्रस्तांची सेवा आणि निधन
वयाची साठी ओलांडली तरी सावित्रीबाई थकल्या नाहीत त्या वेळी प्लेगची साथ आली होती त्या साथीत त्यांनी लोकांची सेवा केली. झोपड्या – झोपड्यात जाऊन रुग्णांना मदत केली. धीर दिला. त्यातच त्यांना प्लेगची लागण झाली त्या ग्लानीत गेल्या आणि त्याच अवस्थेत १० मार्च १८९७ रोजी सतत वर्षे लोकसेवेचे व्रत स्वीकारणारी मायमाऊली काळाच्या उदरात विसावली.
सावित्रीबाईंच्या कार्याने, कृतीने स्वभावाने सामान्य माणसासमोर मोठा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र ज्ञानलालसा, कार्यतत्परता, धैर्यशीलता, कणखरता, सेवाभाव तसेच प्रेमळ मातृभाव ही त्यांची रूपे भुरळ घालणारी आहेत.
त्या उत्तम कवयित्री, उत्कृष्टि वक्ता आणि लेखिका होत्या. समाजसेवा तर त्यांच्या नसानसात भिनली होती. त्या आदर्श पत्नी व आदर्श गृहिणी ही होत्या.
सावित्रीबाईंनी जोतीरावांना आयुष्यभर साथ दिली. त्या केवळ जोतीरावांची सावली होऊन राहिल्या नाहित. त्यांनी त्यांचे स्वतंत्र व प्रभावी कर्तत्व साऱ्या जगासमोर दाखवून दिले.
समतेचा स्वातंत्र्याचा आणि स्त्री- शुद्राच्या प्रतिष्टेचा ध्वज हातात घेऊन मानवतेची द्वाही फिरवणारी ही मराठी मातीतअग्निशलाका जन्मली आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.! निर्भयपणे समाजकार्य आणि विशाल कारुण्याने मानवतेची सेवा करणाऱ्या सावित्रीबाईंनी ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ मध्ये म्हटले आहे.
मनुष्यत्व सारे हिरावून भक्षी
तयाला असे वेद ही सर्व साक्षी
अहंकारी भूदेव मग्रुर झाले
तयी वेळेला बुद्ध जन्मास आले “
सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या साली झाला?
सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील ‘नायगाव’ या गावी झाला
सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कधी सुरू केली?
महात्मा ज्योतिबा फुले आण सावित्री बाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण?
सावित्रीबाई ज्योतिराव फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होय. भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या स्त्री शिक्षिका प्रौढ शिक्षणाच्या’ पुरस्कृत्या, दलितांच्या कैवारी समता प्रणेत्या चळवळीच्या स्त्री मुक्तीच्या आघ प्रणेत्या अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक म्हणजेच कृतीशील समाजसेविका सावित्रीबाई जोतीराव फुले होय.